विंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. तशातच IPL मधील पंजाब संघही अश्विनला संघातून बाहेर काढण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे अश्विनची कारकिर्द धोक्यात येते की काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण या दरम्यान अश्विनला दिलासा देणारी एक बाब होण्याची शक्यता आहे. अश्विनला पंजाब संघातून बाहेर केल्यास दिल्ली संघ त्याला खरेदी करण्यास उत्सुक आहे असे वृत्त इएसपीएनक्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिले आहे.

अश्विनने २ वर्षे पंजाब संघाचे नेतृत्व केले. पण त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी न होऊ शकल्यामुळे पंजाब संघ त्याला सोडचिठ्ठी देणार आहे अशी चर्चा आहे. या परिस्थितीत दिल्ली संघ अश्विनला संघात घेणार असल्याचे समजते आहे. दिल्लीच्या संघाने अश्विनला खरेदी केल्यास तो अश्विनचा चौथा संघ ठरणार आहे. या आधी IPL मध्ये अश्विनने चेन्नई सुपर किंग्ज, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

याचसोबत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी लोकेश राहुल याच्यावर सोपवण्यात येऊ शकते असेही बोलले जात आहे. पंजाबचा संघ अश्विनला संघाबाहेर करत असेल तर आम्ही त्याल संघात घेण्यास तयार आहोत. आमच्यासाठी ती आनंदाची बाब असेल, असे दिल्ली संघाचा मेंटॉर सौरव गांगुलीने सांगितले.

२०१८ साली पंजाबच्या संघाने अश्विनवर ७.६ कोटी रुपयांची बोली लावली होती. यानंतर दोन हंगाम पंजाबचा संघ अश्विनच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये खेळला, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही. अश्विनने पंजाबकडून २८ सामन्यांमध्ये २५ बळी घेतले आहेत.