मुंबईसह सहा शहरांमध्ये ९ एप्रिलपासून हंगामाला प्रारंभ; बाद फेरीसह अंतिम सामना अहमदाबादला

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) यंदाचा १४वा हंगाम ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत मुंबईसह देशातील सहा शहरांमध्ये रंगणार असून, कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवता येणार नाही. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात तरी सर्व सामने प्रेक्षकांविना होणार आहेत, असे रविवारी ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीने जाहीर केले.

अहमदाबाद, बेंगळूरु, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये सामने होणार असून, करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी या सहा शहरांमध्ये मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नईत ९ एप्रिलला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यातील सामन्याने ‘आयपीएल’ हंगामाला प्रारंभ होईल.

‘बीसीसीआय’ने ६ मेपर्यंतच्या पहिल्या चार आठवडय़ांतील ३३ सामन्यांपैकी एकही सामना कोलकातात आयोजित केलेला नाही. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बाद फेरीच्या सर्व सामन्यांसह ३० मे रोजी अंतिम सामना होणार आहे.

‘‘कार्यक्रमपत्रिकेची रचनाच अशा रीतीने करण्यात आली आहे की, प्रत्येक संघाला साखळीत तीनदाच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे जोखीम कमी असेल. सुरुवातीच्या टप्प्यात तरी ‘आयपीएल’चे सामने प्रेक्षकांविना होणार असून, उत्तरार्धातील सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल,’’ अशी माहिती प्रशासकीय समितीच्या सूत्रांनी दिली.

गतवर्षी करोनाच्या साथीमुळे ‘आयपीएल’चा हंगाम उशिराने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आला होता. मुंबई इंडियन्सने या हंगामाचे जेतेपद मिळवले होते. मात्र आता रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यामुळे स्पर्धा भारतात घेण्याचे ठरवण्यात आले आहे.

‘आयपीएल’ची वैशिष्टय़े

*  प्रत्येक संघ हा सहापैकी चार शहरांमध्ये साखळी सामने खेळेल.

*  प्रत्येक संघाचे त्रयस्थ ठिकाणी सामने.

*  ५६ साखळी सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगळूरु या शहरांमध्ये प्रत्येकी १० सामने होतील, तर अहमदाबाद आणि दिल्लीत प्रत्येकी आठ सामने होणार आहेत.

*  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बाद फेरीच्या सर्व सामन्यांसह ३० मे रोजी अंतिम सामना होणार आहे.

*  ११ दिवस दुहेरी सामन्यांचा आनंद चाहत्यांना लुटता येणार आहे. सहा संघ तीन आणि दोन संघ दोन दुपारचे सामने खेळतील.

*  सायंकाळचा सामना ७.३० वाजता सुरू होईल, तर दुपारचा सामना ३.३० वाजता सुरू होईल.