आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडीया यांनी आयपीएलने २०२१ पर्यंत चिनी कंपन्यांसोबतचे सर्व संबंध तोडून टाकायला हवेत असं मत व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये संघर्ष सुरु आहे. यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. चीनच्या या कृत्यानंतर देशभरातून चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी होऊ लागली. बीसीसीआयनेही जनभावनेचा आदर करत, चिनी कंपन्यांसोबतच्या कराराबद्दल पुनर्विचार करण्याची तयारी दाखवली. चिनी मोबाईल कंपनी आणि बीसीसीआय यांच्यात IPL च्या प्रायोजकत्वासाठी २०२२ करार झाला आहे. प्रत्येक हंगामासाठी VIVO कंपनी बीसीसीायला ४०० कोटींपेक्षा जास्त निधी देते.

“आपल्या देशासाठी आपण चिनी कंपन्यांसोबतचे सर्व संबंध तोडून टाकायला हवेत. देश कधीही पहिले यायला हवा, पैसा ही दुय्यम गोष्ट आहे. ही इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धा आहे, चायनिज प्रिमीअर लिग स्पर्धा नाही. चिनी कंपन्यांसोबतचे सर्व संबंध तोडून टाकत आयपीएलने एक आदर्शवत सुरुवात करु शकतं. सुरुवातीला स्पॉन्सर्स मिळवण्यासाठी थोडा त्रास होईल, पण मला खात्री आहे की अनेक भारतीय कंपन्या आयपीएलला स्पॉन्सर करतील. आपला देश, सरकार आणि सीमेवर लढणाऱ्या सैन्याचा आपण आदर ठेवायला हवा.” नेस वाडीया पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

Vivo कंपनी व्यतिरीक्त आयपीएलमध्ये Paytm, Swiggy, Dream 11 या चिनी कंपन्यांनी स्पॉन्सरशीप दिली आहे. यासोबत अनेक संघांनाही चिनी कंपन्यांनी पैसा पुरवला आहे. देशातील जनभावनेचा आदर करत आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने चिनी कंपनीच्या करारावर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे. अद्यापही गलवान खोरं आणि नजिकच्या भागात चीनच्या कुरापती सुरुच आहेत. नुकतच केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी App बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातला हा संघर्ष किती दिवस सुरु राहतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.