देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा प्रादूर्भाव लक्षात घेता बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. माात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल याची शाश्वती नाही. बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आशिया चषकाऐवजी आयपीएल स्पर्धा खेळवता येईल का या प्रयत्नात आहे. तर काही अधिकाऱ्यांच्या मतानुसार यंदाचा हंगाम रद्द होऊ शकतो. अनेक परदेशी खेळाडू आणि काही संघमालकांनी यंदाचा हंगाम खेळवला गेला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. आता माजी खेळाडूही आयपीएलच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसन आणि भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी आयपीएलचा यंदाचा हंगाम खेळवायला हवा असं मत व्यक्त केलं आहे.

“मला मनापासून वाटतंय की यंदा आयपीएलची स्पर्धा खेळवली गेली पाहिजे…जुलै-ऑगस्ट हा यासाठी योग्य काळ असेल. या स्पर्धेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पुन्हा एकदा सुरुवात होऊ शकते. जगातला प्रत्येक खेळाडू आज आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहे. मात्र यासाठी विषाणूचा प्रादुर्भाव कमी असलेली शहरं ओळखून त्या ठिकाणी सामन्याचं आयोजन करण्यात यावं, कोणत्याही चाहत्यांना यंदाच्या हंगामात प्रवेश दिला जाता कमा नये. आयपीएलमुळे अर्थव्यवस्थेला एका प्रकारे चालनाही मिळू शकते. सध्याची परिस्थिती पाहता, ही स्पर्धा केवळ ३-४ आठवड्यांची करता येऊ शकते.” केविन पिटरसन Star Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता.

भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनीही याच कार्यक्रमात आयपीएलला आपलं समर्थन दर्शवलं. “आयपीएल हा अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. आयपीएल म्हणजे फक्त खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एवढंच नसतं…त्यामुळे यंदाचा हंगाम खेळवला गेल्यास आपण या स्पर्धेवर अवलंबून असणाऱ्या लोकांना पुन्हा त्यांच्या पायावर उभं करु शकतो. ज्या क्षणी आपल्याला सरकारकडून सर्व प्रकारच्या परवानग्या मिळतील, त्याक्षणी हा हंगाम खेळवला गेला पाहिजे. यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते…कारण आयपीएल म्हणजे फक्त मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, धोनी इतकच नव्हे, अनेक जण यावर अवलंबून आहेत.”