देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयनेही २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएलची स्पर्धा १५ एप्रलिपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र सध्याच्या घडीला देशातली परिस्थिती लक्षात घेता…१५ एप्रिलनंतरही आयपीएल सुरु होईल की नाही याची खात्री देता येत नाही. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवता येईल का याचा विचार करत आहे. काही संघमालक आणि खेळाडूंनी प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र भारताला पहिला टी-२० विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जोगिंदर शर्माच्या मते करोनाचं संकट टळेपर्यंत आयपीएल व्हायलाच नको.

“करोनाचं संकट टळेपर्यंत आयपीएल स्पर्धा व्हायलाच नको. एकदा सगळी परिस्थिती नियंत्रणात आली की आयपीएल खेळायला हरकत नाही. सध्याच्या परिस्थितीत आयपीएल खेळवल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कितीही मनाई केली तरीही चाहते मैदानाभोवती जमू शकतात, प्रत्येक संघात १५ खेळाडू असतात. टीम मिटींगमध्ये सपोर्ट स्टाफ सोबत असतो…अशा पद्धतीने एका संघात अंदाजे ३०-४० लोकं सोबत असतात. अशा परिस्थितीत धोका वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आताच्या घडीला आयपीएल खेळवायलाच नको,” Espncricinfo संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत जोगिंदर शर्मा बोलत होता.

२००७ टी-२० विश्वचषकात जोगिंदरने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता

 

सध्या जगभरासह भारतात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. या कठीण काळातली जोगिंदर शर्मा हरियाणात आपलं कर्तव्य बजावतो आहे. नाकाबंदी आणि संचारबंदीच्या दरम्यान रस्त्यांवर फिरताना जोगिंदर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जोगिंदर शर्मा हरियाणा पोलिसांत पोलिस उप-अधिक्षक पदावर काम करतो आहे.