सट्टेबाज किशोर बदलानी ऊर्फ केशू पुणे याने आयपीएलच्या सहाव्या पर्वामध्ये कोटय़वधी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. अल्पावधीतच केशू पुणे इतर सट्टेबाजांना मात देत वर आला होता. सट्टेबाजांचा म्होरक्या रमेश व्यास याच्या चौकशीतून किशोर बदलानी ऊर्फ केशू पुणे याचे नाव समोर आले होते. दिल्ली पोलिसांनी श्रीशांतला केलेली अटक आणि मुंबई पोलिसांनी सट्टेबाजांची केलेली धरपकड यामुळे २५ मे रोजी केशू पुणे याने कुटुंबासह युरोपला पळ काढला होता. ‘मेक माय ट्रिप’ या संकेतस्थळावरून त्याने परदेशाच्या तिकिटांची नोंदणी केली होती. कुटुंबासह तो सुरवातीला पॅरिस व तेथून नेदरलँड्स, अ‍ॅमस्टरडॅम, जर्मनी, स्वित्र्झलड आदी ठिकाणी गेला. शेवटी मिलानवरून तो ३ जूनला भारतात परतला. पण मुंबई पोलिसांनी विमानतळावरच त्याला अटक केली.
पुण्यातील सट्टेबाज राम पिंपरी व रमेश मेहरानी या दोन सट्टेबाजांच्या हाताखाली केशू सट्टेबाजी शिकला होता. त्यापूर्वी तो पंटर म्हणून वावरत होता. पण या दोघांकडून सट्टेबाजीचे तंत्र अवगत करून नंतर केशूने त्यांनाही मात दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सट्टेबाज रमेश व्यासच्या संपर्कात आल्यानंतर केशूने परदेशातील सट्टेबाजांबरोबर व्यवहार सुरू केले होते. यंदाच्या आयपीएलमध्येही केशूने कोटय़वधी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. केशूची पोलीस कोठडी १० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.