आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेला विंदू दारा सिंग पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा त्याचा भाऊ अमरिक सिंग यांनी केलाय. अमरिक सिंग चंदीगढ विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात माझा भाऊ गुंतला असेल, यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. यासंदर्भात पुढील तपास झाल्यानंतर विंदू निर्दोष म्हणून सुटेल, अशी मला खात्री आहे.” तसेच “बिग बॉस च्या तिस-या पर्वाचा विंदू विजेता आहे त्यामुळे मुंबईत तो प्रसिद्ध आहे. मुंबईत त्याला अनेक जण ओळखतात तर यात कोणता गुन्हा झालाय असं मला वाटत नाही” असेही अमरिक सिंग म्हणाले
विंदू हा दिवंगत कुस्तीगीर व अभिनेते दारासिंग यांचा मुलगा आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी विंदू दारासिंगला काल (बुधवार) मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतील जुहू येथील त्याच्या निवासस्थानी अटक केली. या प्रकरणाशी निगडीत सर्व चौकशीसाठी आमचे कुटूंब पूर्णपणे सहकार्य करेल असेही अमरिक सिंग यांनी स्पष्ट केले.