आयपीएल ‘स्पॉट-फिक्सिंग’मधील तिन्ही दोषी खेळाडूंविरूद्धचे पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशांतील विविध ठिकाणी छापे टाकायला सुरुवात करून या प्रकरणाचा फास आवळायला सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांच्या पाठोपाठ शनिवारी मुंबई पोलिसांनीही कारवाई केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने एस. श्रीशांतच्या हॉटेलमध्ये छापा टाकत काही गोष्टी जप्त करत त्याच्यावरील कारवाईचे संकेत दिले आहेत. मुंबई पोलिसांबरोबर तामिळनाडू पोलिसांनीही चेन्नईत छापा टाकत ६ सट्टेबाजांना अटक करत त्यांच्याकडून १४ लाख रुपये जप्त केले आहेत.  ‘आमच्याकडे दोषींविरोधात ठोस पुरावे आहेत’ असे दिल्ली पोलिसांनी सांगत गैरव्यवहारातील अजून काही बाबींचे तपशील जमा करायला सुरुवात केली आहे. अजित चंडिलाच्या घरी शनिवारी दुसऱ्यांदा छापा टाकला असला तरी दिल्ली पोलिसांच्या हाती जास्त काही लागलेले नाही. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तिन्ही दोषींची सखोल चौकशी केली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे.यासंदर्भात बीसीसीआयने रविवारी तातडीची कार्यकारिणीची बैठक बोलावली असून यामध्ये कोणता निर्णय घेतला जातो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.