आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी मुद्गल समितीच्या अहवालांतर्गत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एन. श्रीनिवासन यांच्यासह चौघांच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. यात श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन, राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा आणि क्रिकेट प्रशासक सुंदर रामन यांचा समावेश आहे. या अहवालातील तीन खेळाडूंची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.
सध्या तरी या प्रकरणातील खेळाडूंची नावे खुली केली जाणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे प्रमुख टी. एस. ठाकूर यांनी सांगितले. या चार व्यक्तींना अहवालातील तेवढा भाग पाठविण्यात येणार आहे, जेणेकरून पुढील चार दिवसांत याबाबत ते आपला आक्षेप नोंदवू शकतील.k03समितीने चौकशीत काही निष्कर्षांची नोंद केली आहे, त्यानुसार काही व्यक्तींची वैयक्तिक चौकशी होणार आहे. याचप्रमाणे यात काही खेळाडूंच्या नावांचाही उल्लेख आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गैरकृत्य केलेल्या व्यक्तींची नावे मात्र उघड केली नाही.
‘‘आम्ही अहवाल पाहिला आहे आणि काही व्यक्तींनी गैरकृत्य केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. या अहवालात खेळाडू आणि काही तारांकित मंडळींचे नाटय़मय संबंध मांडण्यात आले आहेत,’’ असे नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जनतेसाठी खुल्या सुनावणीतसुद्धा तीन खेळाडूंची नावे उघड केली नाहीत. ते क्रिकेटपटू असल्यामुळे त्यांची नावे चौकशीच्या या टप्प्यावर तरी समोर येऊ नये, असे मांडण्यात आले.
दरम्यान, खटला चालू असल्याचे कारण दाखवत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २० नोव्हेंबरला होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा चार आठवडय़ांसाठी पुढे ढकलली.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार असून, या चौघांनाही न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३५ पानी अहवालात खेळाडूंच्या नावांऐवजी आकडे वापरण्यात आले आहेत. स्वतंत्र अहवालात त्यांची ओळख स्पष्ट  करण्यात आली आहे.
मनोहर यांनी बीसीसीआयला फटकारले
वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी फटकारले आहे. बीसीसीआयची सभा २० नोव्हेंबरला होणार होती, पण सर्वोच्च न्यायालयाने मुद्गल समितीच्या अहवालातील प्रशासक एन. श्रीनिवासन यांचे नाव जाहीर केल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला असून हे नियमांचे उल्लंघन असल्याचे मत मनोहर यांनी व्यक्त केले आहे.  ‘‘मुद्गल समितीच्या अहवालात एन. श्रीनिवासन यांच्यावर आरोप ठेवण्यात आल्याचे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले तेव्हा  बीसीसीआयने वार्षिक सभा पुढे ढकलण्याची विनंती केली. २० नोव्हेंबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या सभेचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. एखादा निर्णय जर कार्यकारी समितीने बैठकीमध्ये घेतला असेल तर बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला तो बदलण्याचा अधिकार नाही,’’ असे मनोहर म्हणाले.
..तर पवारांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा
बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत असताना शरद पवार यांनी मात्र अध्यक्षपदासाठी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. क्रिकेट प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तसेच आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या पवारांनी काही दिवसांपूर्वीच वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी एमसीएचा प्रतिनिधी म्हणून आपण हजेरी लावणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी पवार अध्यक्षपदासाठी रिंगणात असल्याची चर्चा होती. परंतु शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत श्रीनिवासन यांचे नाव उघडकीस आले आहे. जर श्रीनिवासन हे मुद्गल यांच्या अहवालांतर्गत सुनावणीत दोषी आढळल्यास स्वाभाविकपणे पवारांचा मार्ग मोकळा होऊ शकेल आणि ते पूर्व विभागाचे सूचक आणि अनुमोदनाचे पाठबळ घेऊन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान होऊ शकतील.