*  एन. श्रीनिवासन यांच्यासाठी धोक्याची घंटा
*  बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक ८ जूनला
आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अजय शिर्के आणि सचिव संजय जगदाळे यांनी राजीनामा दिल्यामुळे क्रिकेटजगतामध्ये खळबळ माजली आहे. भारतीय क्रिकेटला गेले दोन आठवडे नवनवे हादरे बसले आहेत. या प्रकरणात जावई अडकल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी देशभरात जोर धरू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक ८ जूनला बोलावण्यात आल्यामुळे श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे.
बीसीसीआयच्या कार्यकारिणीमधील तीन महत्त्वाच्या सदस्यांनी दडपण आणल्यामुळे कार्यकारिणी समितीची घोषणा झाल्याचे समजते. श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्यासाठी कार्यकारिणी समिती त्यांच्यावर दडपण आणू शकते. परंतु त्यांना पदावरून हटविण्याची क्षमता कार्यकारिणीकडे नाही. मात्र सर्व राज्य संघटनांचे सदस्य सहभागी असलेली विशेष सर्वसाधारण सभा त्यांना पदावरून हटवू शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे, संयुक्त सचिव अनुराग ठाकूर आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के यांनी स्वत:च्या राजीनाम्याची धमकी दिल्यामुळे बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीची घोषणा सायंकाळी करण्यात आली. त्यानंतर रात्री शिर्के आणि जगदाळे यांनी आपला राजीनामा सादर करून एकप्रकारे श्रीनिवासन यांना पदावरून पायउतार होण्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

भारतीय क्रिकेट क्षेत्रात ज्या काही अनुचित घटना घडत आहेत. त्यामुळे मी अतिशय दु:खी झालो आहे म्हणूनच हा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा मी श्रीनिवासन यांच्याकडे पाठविला आहे. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्याकरिता मंडळाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्या समितीत मी काम करू शकणार नाही. श्रीनिवासन व मंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा की नाही हे मी सांगू शकणार नाही.
-संजय जगदाळे, बीसीसीआयचे सचिव

स्पॉट-फिक्सिंग व बीसीसीआय यांचा काहीही संबंध नाही. मात्र काही जणांनी विनाकारण त्याचा संबंध जोडून सतत मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी अतिशय व्यथित झालो आहे आणि बीसीसीआयवर अशा स्थितीत काम करणे अशक्य आहे.
अजय शिर्के, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष

स्पॉट-फिक्सिंगबाबत मत व्यक्त करण्याची आपली इच्छा नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, राजकारण आणि खेळ या दोन्ही गोष्टींची सरमिसळ करू नये.
मनमोहन सिंग, भारताचे पंतप्रधान

देशात आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंगचा वाद चांगलाच उफाळून आला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु राजकारण्यांनी राजकारण करावे, तर खेळाडूंनी त्यांच्या खेळावरच लक्ष द्यावे.
मुलायमसिंग यादव,
समाजवादी पक्षाचे नेते

स्पॉट-फिक्सिंगखेरीज अन्य कोणत्याही विषयावर मी उत्तर देऊ शकेन. मात्र आयपीएलविषयी मी काहीही मत व्यक्त करणार नाही.
शशी थरूर,
मनुष्य बळ विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री