IPL स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेल्या क्रिकेटपटू श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. BCCI ने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हा निर्णय म्हणजे माझ्यासाठी एक लाईफलाईन मिळाली आहे, असे मत श्रीसंतने व्यक्त केले आहे.

IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर श्रीसंतवर BCCI ने आजीवन बंदी घातली होती. मात्र आता या आजीवन बंदीच्या शिक्षेबाबत BCCI ने पुनर्विचार करावा आणि ३ महिन्यांच्या आत याबाबतचा निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ”सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे मला मिळालेली एक लाईफलाईन आहे. या निर्णयामुळे मला आशेचा किरण दिसला आहे. ९० दिवस म्हणजेच ३ महिन्यांच्या कालावधीत माझ्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयावर विचार होईल. पण तोपर्यंत न थांबता मी आतापासूनच क्रिकेटच्या नेट्समध्ये सराव करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच मी क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करेन”, असा विश्वास श्रीसंतने व्यक्त केला आहे.

मी आता ३६ वर्षांचा आहे. एका वेगवान गोलंदाजाच्या दृष्टीने ३३-३४ व्या वर्षी तो निवृत्त होतो. या वयात वेगवान गोलंदाजासाठी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे हे एक आव्हानच आहे. पण मी अजूनही तंदुरुस्त आहे. आणि मी लवकरच पुनरागमन करेन. BCCI माझ्यावरील बंदीची शिक्षा लवकरच उठवण्याचा निर्णय घेईल, अशी आशाही त्याने व्यक्त केली.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतला दिलासा

श्रीसंतला २०१३ मध्ये IPL स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर BCCI ने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आजीवन बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे श्रीसंतने म्हटले होते. पण काही दिवसांपूर्वी आपण पोलिसांच्या भीतीने आपण हा गुन्हा कबूल केल्याचा दावा श्रीसंतने केला होता. सर्वोच्च न्यायालयात श्रीसंतने दिल्ली पोलिसांनी आपल्या कुटुंबाला गोवण्याची तसेच छळ करण्याची धमकी दिल्यानेच आपण स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा कबूल केला असल्याचे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने स्पॉट फिक्सिंगच्या काळात श्रीसंतची वर्तवणूक योग्य नव्हती, असा ठपका ठेवला. आपल्यावर BCCI कडून लावण्यात आलेली बंदी अत्यंत कठोर असून आपण बेकायदेशीर गोष्टींमध्ये सहभागी होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नव्हता, असेही श्रीसंतकडून न्यायाधीश अशोक भूषण आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सांगण्यात आले होते.