08 March 2021

News Flash

‘स्पॉट-फिक्सिंग’नंतरचा अनुभव सर्वात खडतर -हरमीत सिंग

आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने संपूर्ण विश्व ढवळून निघाले आहे. या प्रकरणाचा सर्वात जास्त फटका बसला, त्या राजस्थान रॉयल्स संघातील फिरकीपटू हरमीत सिंग हासुद्धा या प्रकरणाने हादरून

| June 12, 2013 12:41 pm

आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने संपूर्ण विश्व ढवळून निघाले आहे. या प्रकरणाचा सर्वात जास्त फटका बसला, त्या राजस्थान रॉयल्स संघातील फिरकीपटू हरमीत सिंग हासुद्धा या प्रकरणाने हादरून गेला आहे. ‘स्पॉट-फिक्सिंग’नंतरचे संघातील वातावरण आणि या संपूर्ण प्रकरणानंतरचा अनुभव माझ्यासाठी सर्वात खडतर होता, असे हरमीतने सांगितले.
‘‘हे प्रकरण समोर आल्यानंतर संघातील प्रत्येकालाच मोठा धक्का बसला होता. आमच्या संघातील खेळाडूच स्पॉट-फिक्सिंगमध्ये गुंतले असल्याचे ऐकून आम्ही चकित झालो. पण त्यानंतर संघाने कठोर पावले उचलली आणि आम्ही सांघिकदृष्टय़ा एकत्र आलो. युवा खेळाडू या नात्याने, माझ्यासाठी हा अनुभव सर्वात खडतर होता. कर्णधार राहुल द्रविडला २००० मधील या प्रकरणाचा अनुभव होता. म्हणूनच त्याने आम्हाला खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि कणखर बनण्याचा सल्ला दिला. या प्रकरणानंतरचा पहिला सामना आम्ही गमावला. त्यामुळे आम्ही तीन दिवस जयपूरला मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला. त्यादरम्यान प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी आम्हाला मानसिकतेचे धडे दिले,’’ असेही त्याने सांगितले.
आयपीएलमधील एकमेव सामन्याच्या अनुभवाबद्दल तो म्हणाला, ‘‘डावातील पहिले षटक टाकण्याची द्रविडने संधी दिली, तो माझ्यासाठी सर्वात मोठा क्षण होता. पहिले षटक चांगले टाकल्यानंतर दुसऱ्या षटकांत मी बऱ्याच धावा दिल्या. पण द्रविडने माझा आत्मविश्वास उंचावला. पण तरीही अखेरच्या दोन्ही षटकांत मी छाप पाडू शकलो नाही. द्रविड आणि शेन वॉटसनसारख्या दिग्गज फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करणे हे माझ्यासाठी प्रेरणादायी होते. चांगला चेंडू टाकल्यानंतर ते माझे कौतुक करायचे. पण माझे चुकत असताना, ते मला समजावून सांगायचे. त्यांच्याकडून मी बरेच काही शिकलो.’’
मुंबईला सोडचिठ्ठी देणारा हरमीत आता रणजी स्पर्धेत विदर्भकडून खेळणार आहे. ‘‘मुंबईचा संघ बलाढय़ आहे. पण भारतातर्फे खेळण्याचे माझे उद्दिष्ट आहे, त्यासाठी मला संधी मिळण्याची गरज आहे. मुंबईकडून मला फारशी संधी मिळत नव्हती. विदर्भने मला तसा प्रस्ताव दिल्यानंतर मी तो लगेच स्वीकारला. लेगस्पिनर साईराज बहुतुलेच्या उपस्थितीत मला बरेच काही शिकता येईल,’’ असेही त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 12:41 pm

Web Title: ipl spot fixing was my most terrifying experience says harmeet singh
टॅग : Ipl Spot Fixing
Next Stories
1 फेडररला मागे टाकण्याचे राफेल नदालचे ध्येय!
2 दयनीय फलंदाजीमुळे पाकिस्तानचा पराभव
3 कंपन्यांमधील गुंतवणुकीबाबत धोनीची बीसीसीआयकडून चौकशी होणार
Just Now!
X