इंग्लंडच्या संघाला पहिलावहिला विश्वचषक जिंकवून देणारे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलीस यांना IPL च्या सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हैदराबाद संघ व्यवस्थापनाने गुरुवारी (१८ जुलै) याबाबत घोषणा केली. २०१३ पासून हैदराबाद संघाचे प्रशिक्षक असणाऱ्या टॉम मूडी यांच्या जागी बेलीस यांची नियुक्ती झाली आहे.

ऍशेस २०१९ नंतर इंग्लंडच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार असल्याचे बेलीस यांनी आधीच स्पष्ट केले होते. बेलीस यांनी आधी IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने २ विजेतेपदं मिळवली. याशिवाय बेलीस सिडनी सिक्सर्स संघाचे प्रशिक्षक असताना संघाने बिग बॅश लीग आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे विजेतेपद देखील पटकावले होते. याशिवाय २०११ साली विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत उपविजेता ठरलेल्या श्रीलंकेच्या संघाचे ते प्रशिक्षक होते.

‘हैदराबाद संघ व्यवस्थापनाने अत्यंत विचार करून प्रशिक्षक बदलाचा निर्णय घेतला आहे. आम्ही टॉम मूडी यांना त्यांच्या पदावरून आणि जबाबदारीतून मुक्त करत आहोत’, असे हैदराबाद संघाच्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रेव्हर बेलीस यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने नुकताच विश्वचषक जिंकला आहे. बेलीस यांच्या नावावर IPL मधील दोन विजेतेपदे आहेत. तसेच बिग बॅश लीग आणि चॅपियन्स लीग स्पर्धेची विजेतेपदे देखील आहेत. ट्रेव्हर बेलीस हे खरे विजेते आहेत. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे हैदराबाद संघाला फायदा होईल असा विश्वासही प्रसिद्धीपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.