इंग्लंडमधील खेळाडूंच्या माघारसत्राबाबत ‘बीसीसीआय’ला पत्र

मुंबई : जॉनी बेअरस्टो (सनरायजर्स हैदराबाद), ख्रिस वोक्स (दिल्ली कॅपिटल्स) आणि डेव्हिड मलान (पंजाब किंग्ज) या इंग्लंडच्या तीन क्रिकेटपटूंनी अखेरच्या क्षणी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधून माघार घेतल्यामुळे संघांनी नाराजी प्रकट केली आहे. यापैकी एका संघाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पत्र लिहून आपली नाराजी प्रकट केली आहे.

भारताविरुद्धची पाचवी कसोटी रद्द होताच ‘आयपीएल’साठी संयुक्त अरब अमिराती प्रवासाचा दोन्ही खेळाडूंचा मार्ग मोकळा झाला. परंतु वैयक्तिक कारणास्तव बेअरस्टो, वोक्स आणि मलान यांनी माघार घेतल्यामुळे संघ अडचणीत सापडले आहेत. हैदराबादने बेअरस्टोच्या जागी शेर्फान रुदरफोर्डचा, तर पंजाबने मलानच्या स्थानी एडीन मार्करामला संघात घेतले आहे.

‘‘इंग्लंडमधील करारबद्ध खेळाडूशी गुरुवारी माझी बोलणी झाली. अमिरातीत १५ सप्टेंबरला येणार असल्याचे त्यांनी निश्चित केले. त्या दृष्टीने आम्ही पुढील तयारी केली. परंतु शनिवारी या खेळाडूने येणार नसल्याचे कळवले. त्यामुळे मार्गदर्शक चमू आणि व्यवस्थापनाची निराशा झाली आहे. हे पूर्णत: व्यावसायिकतेला आणि करारातील भावनेला तडा जाणारे आहे. याबाबतचे पत्र आम्ही ‘बीसीसीआय’ला पाठवले आहे,’’ अशी माहिती ‘आयपीएल’मधील एका संघाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

६ यंदाच्या ‘आयपीएल’मधून इंग्लंडच्या एकूण ६ खेळाडूंनी वैयक्तिक किंवा दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतली आहे. यात तीन खेळाडूंच्या माघारीमुळे राजस्थान रॉयल्सला सर्वाधिक फटका बसला आहे. यात जोस बटलर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स (तिघेही राजस्थान), ख्रिस वोक्स (दिल्ली), जॉनी बेअरस्टो (दिल्ली) आणि डेव्हिड मलान (पंजाब) यांचा समावेश आहे.