आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीयर लिग या स्पर्धेची १० पर्व पार पडल्यानंतर बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने पुढच्या हंगामासाठी सुरुवात केली आहे. अकराव्या हंगामात सर्व खेळाडूंचा लिलाव पुन्हा नव्याने होणार असून, दहाव्या पर्वातील गुजरात आणि पुणे हे दोन संघ अकराव्या पर्वात सहभागी होणार नाहीत. मंगळवारी नवी दिल्लीत आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली. Cricinfo या वेबसाईटने दिलेल्या बातमीनूसार, प्रत्येक संघाला आपल्या संघातील ३ खेळाडूंना कायम राखण्याची मूभा देण्यात येऊ शकते.

याविषयी गव्हर्निंग काऊन्सिलने कोणताही ठाम निर्णय घेतलेला नाहीये, १४ नोव्हेंबररोजी होणाऱ्या पुढील बैठकीत खेळाडूंना कायम राखण्यासाठीचे नियम, लिलावात बोलीसाठी लागणारी रक्कम आणि ‘राईट टू मॅच कार्ड’ यासारख्या नियमांवर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ अकराव्या पर्वात आपलं पदार्पण करणार आहेत. त्यामुळे या संघांसमोर पुणे आणि गुजरात या संघातील खेळाडूंना आपल्या संघात कायम राखण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

अकराव्या हंगामाच्या लिलावाआधी आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमिन यांनी सर्व संघमालकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीत अमिन यांनी संघमालकांना सर्व खेळाडूंना कायम राखण्यासंदर्भातले नियम आणि इतर बाबींची कल्पना दिली. मिळालेल्या माहितीनूसार काही संघमालक हे लिलावासाठी ८० कोटी तर काही संघमालक हे ७५ कोटी रक्कम ठेवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे या सर्व बाबींवर १४ नोव्हेंबरच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पहावं लागणार आहे.