बहुप्रतिक्षित IPL 2020 ला सप्टेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर असा IPLचा जम्बो कार्यक्रम असणार आहे. या स्पर्धेचे वेध लागल्याने आता IPL संघ हळूहळू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होताना दिसत आहेत. त्यामुळे दोन संघांमध्ये ट्विटरवर द्वंद्व रंगू लागली आहेत. नुकतंच राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात जोरदार ट्विटरवॉर रंगलं.

राजस्थानने सुरुवातीला एक ट्विट केलं. “बेन स्टोक्सचं पुस्तक वाचणं खूप रोमांचक ठरेल”, असं कॅप्शन देत त्यांनी एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोत राजस्थानचा स्टोक्स आणि हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर हे दोघे होते. स्टोक्सने आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की अॅशेस मालिकेत वॉर्नर खेळताना खूपच बाचकत होता. त्याला नीट खेळणं जमत नव्हतं. यावरून राजस्थान संघाने हैदराबाद संघाची टिंगल केली.

त्यावर हैदराबादने खोचक टोमणा मारला की डेव्हिड वॉर्नर जेव्हा चौथ्यांदा ऑरेंज कॅप (IPLमधील सर्वाधिक धावा) जिंकेल तेव्हा तुम्हीच त्याला गिफ्ट म्हणून स्टोक्सचं पुस्तक द्या. वॉर्नरने आतापर्यंत सर्वात जास्त वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. त्यामुळे त्यांनी हा टोमणा मारला.

त्यावर राजस्थानने स्टुअर्ट ब्रॉडला वॉर्नरविरोधात गोलंदाजीला उतरवण्याचं ट्विट केलं. तर ब्रॉडसाठी युवराज सिंगला आम्ही मैदानात उतरवू शकतो, असं हैदराबाद संघाने म्हटलं.

दरम्यान, २० ऑगस्टनंतर सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिथेच क्वारंटाइन कालावधी संपवून सराव सत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे.