करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे सध्या भारतात काही अंशी लॉकडाउन सुरू आहे. गेले तीन-चार महिने देशात क्रीडा स्पर्धा भरवण्यात आलेल्या नाहीत. देशातील सर्वात लोकप्रिय असलेली IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जोवर T20 World Cup वर अंतिम निर्णय होत नाही, तोवर IPL चे आयोजन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे BCCI चे डोळेदेखील ICC च्या निर्णयाकडे लागले आहेत. पण असे असले तरी भारतीय आणि परदेशी खेळाडूंचे IPL वरील प्रेम कमी झालेले नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने IPL बद्दल महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे.

विल्यमसनने एका मुलाखतीत IPL ची स्तुती केली. IPL ही सर्वात मोठी लीग स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये खेळले जाणारे क्रिकेट हे उच्च दर्जाचे असते, असे मत त्याने मांडले. “IPL जेव्हा सुरू झालं तेव्हा सुरुवातीला ती स्पर्धा कशी खेळली जाते यावर माझं सारं लक्ष होतं. कारण त्यावेळी सगळंच नवीन होतं आणि T20 क्रिकेटदेखील फारसं परिचयाचं नव्हतं. पण ही एक मोठ्या स्तरावरील स्पर्धा आहे हे सुरुवातीपासूनच समजलं होतं. त्यामुळे मी स्पर्धेत संधी आणि अनुभव अशा दोन्ही गोष्टींसाठी आलो. भारतात क्रिकेटसाठी असलेले वेड पाहणं हीदेखील खूप मोठी गोष्ट आहे. म्हणूनच क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांनी नंतर IPL च्या धर्तीवर लीग स्पर्धा सुरू केल्या”, असे विल्यमसन म्हणाला.

न्यूझीलंडचा संघ आणि IPL संघ, दोन्हीचे नेतृत्व करण्यात खूप फरक आहे. हैदराबाद संघातून खेळताना सुरुवातीला मला कळायचं नाही की आपण खेळाडूंकडून काय अपेक्षा ठेवू शकतो. भारताच्या मातीत हा खेळ खेळला जातो, त्यामुळे तेथील माहोल काहीसा वेगळा असतो. सारेच संघ सर्वोत्तम खेळाडूंनी युक्त असतात, त्यामुळे मी शक्य तितके पर्याय संघात ठेवण्याचं प्रयत्न करतो. आणि म्हणूनच हैदराबाद संघाचे नेतृत्व करताना जास्त मजा येते”, असेही विल्यमसनने संगितले.