आयपीएल क्रिकेट स्पर्धेत फ्रँचाईजी नसलेल्या पुणे शहरास यंदा आयपीएलचे सामने आयोजित करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, किंग्ज इलेव्हन पंजाबने केलेल्या विनंतीनुसार त्यांचे दोन किंवा तीन सामने पुण्यात आयोजित केले जातील. गतवर्षी चेन्नईतील स्थानिक संघटकांबरोबर झालेल्या मतभेदांमुळे चेन्नई संघाचे सामने रांची येथे घेण्यात आले होते. यंदा चेन्नईत सामने होणार आहेत. हे सामने चेपॉक येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरच घेतले जातील. मात्र या संघाचे गुरुनाथ मयप्पन हे सट्टेबाजीत दोषी आढळल्यानंतर या संघाचे भवितव्य अद्याप अनिश्चित आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने या फ्रँचाईजीला कोणती शिक्षा द्यायची हा निर्णय घेतलेला नाही. त्यांच्या निर्णयानंतरच या संघाचे भवितव्य निश्चित होईल. त्यांच्याबरोबरच सट्टेबाजीत दोषी आढळलेल्या राजस्थान रॉयल्स व या संघाचे मालक राज कुंद्रा यांच्यावरही अद्याप कारवाई झालेली नाही. तूर्तास या संघाचे सामने अहमदाबाद येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गतवर्षी सहारा पुणे वॉरियर्स संघाला स्पर्धेतून काढण्यात आल्यामुळे पुण्यात आयपीएलचा एकही सामना झाला नव्हता.