युवा ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामासाठी जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र रविवारी सायंकाळी होणाऱ्या लढतीत त्यांच्यापुढे झुंजार वृत्तीच्या सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असल्याने दिल्ली विजयी हॅट्ट्रिक लगावण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

गुणतालिकेत सध्या तिसऱ्या स्थानी असलेल्या दिल्लीने चार सामन्यांत तीन विजय मिळवले आहेत. त्याशिवाय गतवर्षी हैदराबादलाच नमवून त्यांनी प्रथमच अंतिम फेरी गाठली होती. मात्र गेल्या पाच हंगामात बाद फेरी गाठणारा एकमेव संघ असलेल्या हैदराबादमध्ये दिल्लीला धक्का देण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यातच दिल्लीविरुद्धच्या लढतींची आकडेवारी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादच्या बाजूने आहे. त्यामुळे चेपॉकवर होणाऱ्या या अखेरच्या साखळी सामन्यात रंगतदार झुंज पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वीकडून सातत्य अपेक्षित

दिल्लीचे शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथ एक बाजू सांभाळून धरण्यात पटाईत आहेत. मात्र चार सामन्यांत अनुक्रमे ७२, २, ३२, ७ अशा धावा करणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉकडून दिल्लीला सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. कॅगिसो रबाडा आणि आवेश खान यांच्यावर वेगवान माऱ्याची भिस्त असून फिरकीला पोषक खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीतील सामनावीर अमित मिश्रा पुन्हा एकदा दिल्लीसाठी विजयवीराची भूमिका बजावू शकतो.

सनरायजर्स हैदराबाद- विल्यम्सनचा समावेश फलदायी

सुरुवातीचे तीन सामने गमावल्यानंतर पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीत मधल्या फळीत अनुभवी केन विल्यम्सनचा केलेला समावेश हैदराबादसाठी फलदायी ठरला. त्यामुळे आता वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोची सलामी जोडी अधिक आक्रमकतेने फलंदाजी करू शकते. थंगरासू नटराजन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने भुवनेश्वर कुमारवरील जबाबदारी वाढली आहे. विश्वातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या रशिद खानपासून दिल्लीला सावध राहावे लागणार आहे.

१८ हैदराबाद-दिल्ली यांच्यात झालेल्या १८ लढतींपैकी हैदराबादने ११, तर दिल्लीने सात सामन्यांत विजय मिळवला आहे.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा.