जैव-सुरक्षित वातावरणात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात येणार आहेत.

‘‘सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अमिरातीत ‘आयपीएल’चे आयोजन करण्यास विशेष सर्वसाधारण सभेने संमती दिली आहे. या स्पर्धेच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील,’’ असे बैठकीनंतर ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

भारतात सप्टेंबरपर्यंत पावसाळा सुरू असतो. त्यामुळे २०२०प्रमाणेच अमिरातीमधील तीन मैदानांवर स्पर्धा आयोजित करणे सोयिस्कर ठरेल. या तारखा १८ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीतील असतील. या तारखांना खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत पदाधिकाऱ्यांनी सदस्यांना माहिती दिली. ‘‘पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेमुळे इंग्लंडचे खेळाडू ‘आयपीएल’ खेळू शकले नाहीत. परंतु आम्ही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडे खेळाडूंची मागणी करणार नाही. ‘आयपीएल’मधील उर्वरित ३१ सामने पूर्ण करणे हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.