संयुक्त अरब अमिरातीमध्ये रविवार म्हणजेच १९ सप्टेंबर २०२१ पासून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित स्पर्धेला सुरुवात होत आहे. यासाठी सर्वच संघ युएईमध्ये दाखल झाले असून सर्वांचाच जोरदार सराव सुरु आहे. भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यानची पाचवी कसोटी रद्द होताच ‘आयपीएल’साठी अनेक खेळाडू संयुक्त अरब अमिरातीमध्ये पोहचले आहेत. मात्र त्यापूर्वीच इंग्लंडविरुद्ध मालिकेत न खेळणारे संघ युएईत दाखल होऊन क्वारंटाइन कालावधी संपवून सराव सामने खेळू लागलेत. याच खेलाडूंपैकी एक असणाऱ्या रॉयल चँलेंजर्स बंगळूरु म्हणजेच आरसीबीचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सने धडाकेबाज कामगिरी केलीय. डिव्हिलियर्सने सराव सामन्यामध्येच शतक ठोकलंय.

आरसीबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केलेल्या व्हिडीओत डिव्हिलियर्सने तुफान फटकेबाजी केल्याचं दिसत आहे. डिव्हिलियर्सने सराव सामन्यात शतक ठोकलं असतानाच त्याचा संघ सहकारी आणि भारताचा तरुण खेळाडू के. एस. भरतनेही ९५ धावांची शानदार खेळी केलीय. देवदत्त ११ आणि हर्शल्स ११ या अशा दोन संघांदरम्यान आरबीसीने हा सराव सामना खेळवला.

कोहलीला चिंता बायोबबलची

भारतीय कर्णधार विराट कोहलीने करोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने इंग्लडविरोधातील मँचेस्टरचा सामना रद्द होणं हे दूर्देवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच सध्याच्या या कठीण कालावधीमध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये जैव सुरक्षित वातावरण म्हणजेच बायो बलल आणखीन मजबूत असेल अशी अपेक्षा व्यक्त केलीय. इंग्लंडमधील कसोटी रद्द झाल्यानंतर रविवारी विराट कोहली आणि मोहम्मद सिराज हे दोघे दुबईमध्ये दाखल झाले. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून आयपीएलचे उर्वरित पर्व सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर आरसीबीच्या डिजीटल माध्यमांवरुन संवाद साधताना कोहलीने युएई आणि ओमानमधील क्रिकेट स्पर्धा या किती आव्हानात्मक असतील याबद्दल भाष्य केलं. “हे दूर्देवी आहे की आम्हाला येथे (कसोटी रद्द झाल्याने दुबईला) लवकर यावं लागलं. मात्र करोनामुळे बऱ्याच गोष्टी अनिश्चित आहेत. अशा परिस्थितीमध्ये काहीही घडू शकतं. अपेक्षा आहे की येथे एक चांगलं, सक्षम आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यामध्ये (बायो बलल सुरक्षित ठेवण्यात) यश येईल आणि आयपीएलचं हे पर्व शानदार असेल,” अशी अपेक्षा कोहलीने व्यक्त केलीय.

रविवारपासून सुरुवात होणार, कोहलीचा संघ सोमवारी मैदानात उतरणार

ही स्पर्धा सध्या आरसीबीसाठी फार महत्वाची आहे तसेच नंतर भारतीय क्रिकेट संघ याच ठिकाणी टी २० विश्वचषक खेळणार असल्याने त्यांनाही ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे, असं कोहलीने म्हटलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ रविवारी उर्वरित पर्वामधील पहिला सामना येत्या रविवारी खेळवला जाणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ सोमवारी मैदानात उतरले. अनेक परदेशी खेळाडूंनी या स्पर्धेमधून माघार घेतल्यानंतर सर्वच संघांनी नवीन खेळाडूंसोबत करार केले आहेत.

…अन् खेळाडू युएईला आले

‘आयपीएल’ संघांशी करारबद्ध भारतीय क्रिकेटपटू शनिवारी संयुक्त अरब अमिरातीसाठी रवाना झाले. इंग्लंडमधील भारतीय खेळाडूंची सलग दोन दिवस करोना (आरटी-पीसीआर) चाचणी करण्यात आली. या दोन चाचण्यांचे अहवाल नकारात्मक आल्यानंतर प्रत्येक ‘आयपीएल’ संघाने आपापल्या खेळाडूंना अमिरातीला नेण्याची सोय केली.