News Flash

मोजक्या क्रिकेटरसिकांच्या साक्षीने महिला आयपीएलची रंगीत तालीम

बीसीसीआयने अयोग्य नियोजन केल्यामुळे चाहत्यांचा अपेक्षित प्रतिसाद या सामन्याला मिळू शकला नाही.

छाया : केव्हिन डिसुजा

पुरुषांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटला प्रारंभ झाल्यानंतर एका दशकाच्या अंतराने महिलांच्या लीगसंदर्भात सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. परंतु मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर तुरळक क्रिकेटरसिकांच्या साक्षीने महिला आयपीएलची रंगीत तालीम रंगली. ना चाहते, ना चीअरलीडर, ना सेलिब्रेटी, मात्र तरीही सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला.

पुरुषांच्या आयपीएलचे सामने प्रकाशझोतात खेळवणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांच्या लीगच्या दिशेने वाटचाल करताना फारसे गांभीर्य न दाखवल्याचेच दिसून आले. मे महिन्याच्या लख्ख उन्हात दुपारी २ वाजता हा सामना सुरू झाला. रात्री होणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील बाद फेरीच्या सामन्याचे तिकीट काढणाऱ्या क्रिकेटरसिकांना महिलांचा प्रदर्शनीय सामना मोफत पाहता येणार होता. परंतु बीसीसीआयने अयोग्य नियोजन केल्यामुळे चाहत्यांचा अपेक्षित प्रतिसाद या सामन्याला मिळू शकला नाही.

ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हाज यांच्यातील सामन्यात २४ चौकार आणि ३ षटकारांचा वर्षांव झाला. काही लक्षवेधी झेलसुद्धा पाहायला मिळाले. यापैकी हरमनप्रीत कौरने घेतलेल्या झेलने विशेष दाद मिळवली. या सामन्याची रंगत अखेरच्या चेंडूपर्यंत टिकली. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाज संघाने ट्रेलब्लेझर्सचा तीन विकेट राखून पराभव केला. ट्रेलब्लेझर्सने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १२९ धावा उभारल्या. यात सुझी बेट्स (३२) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (२५) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. मग सुपरनोव्हाजने डॅनियल व्याट (२४), मिताली राज (२२) आणि हरमनप्रीत कौर (२१) यांच्या फलंदाजीच्या बळावर हे लक्ष्य गाठले.
 संक्षिप्त धावफलक

ट्रेलब्लेझर्स : २० षटकांत ६ बाद १२९ (सुझी बेट्स ३२, जेमिमा रॉड्रिग्ज २५; मेगान शूट २/१८) पराभूत वि. सुपरनोव्हाज : २० षटकांत ७ बाद १३० (डॅनियल व्याट २४, मिताली राज २२, हरमनप्रीत कौर २१; पूनम यादव २/२१) सामनावीर : सुझी बेट्स.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 2:13 am

Web Title: ipl women t20 supernovas vs trailblazers
Next Stories
1 महिला ट्वेन्टी-२० लीगसाठी ‘बीसीसीआय’ने पुढाकार घ्यावा
2 जडेजाच्या पत्नीला मारहाण करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक
3 ‘ब्युटी विथ गेम’; जगातील या ‘टॉप ५’ सुंदर महिला क्रिकेटपटू पाहिल्यात का?
Just Now!
X