News Flash

‘आयपीएल’च्या भवितव्याचा आज निर्णय!

प्रशासकीय समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष

IPL 2020चे आयोजन युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.

बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी अद्याप केंद्र शासनाने स्पर्धेच्या आयोजनासाठी परवानगी दिलेली नाही. त्याव्यतिरिक्त स्पर्धेशी निगडित अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याने रविवारी होणाऱ्या ‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीच्या बैठकीकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

‘आयपीएल’चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गेल्या आठवडय़ात स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे ‘आयपीएल’ खेळवण्यात येणार आहे. प्रशासकीय समितीच्या बैठकीत प्रमाणित कार्यपद्धती, स्पर्धेचे वेळापत्रक, विदेशी खेळाडूंची उपलब्धता, चिनी प्रायोजकांविरुद्धची भूमिका यांसारख्या मुद्दय़ांवर चर्चा केली जाणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, खजिनदार अरुण धुमाळ, हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंग अमिन यांच्या उपस्थितीत टेलिकॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेण्यात येणार आहे.

प्रशासकीय समितीच्या बैठकीतील प्रमुख मुद्दे

केंद्र शासनाची परवानगी

प्रशासकीय समितीच्या बैठकीतील सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र शासनाकडून स्पर्धेच्या आयोजनाची परवानगी. ‘बीसीसीआय’ने गेल्या महिन्यातच यासंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. त्यामुळे रविवारी अखेरीस ‘आयपीएल’च्या आयोजनाला केंद्र शासन हिरवा कंदील दाखवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

भारतीय खेळाडूंसाठी सरावाची व्यवस्था

जवळपास गेल्या पाच महिन्यांपासून भारतातील सर्व पातळीवरचे क्रिकेट बंद असल्याने खेळाडू सरावापासून दुरावले आहेत. त्यामुळे ‘आयपीएल’ सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंच्या सरावासाठी ‘बीसीसीआय’ला पावले उचलावी लागणार आहेत. २० ऑगस्टपर्यंत सर्व फ्रँचायझींनी अमिरातीत दाखल व्हावे, अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली होती.

प्रमाणित कार्यपद्धती

‘आयपीएल’चे भारताबाहेर आयोजन करणे ‘बीसीसीआय’साठी नवे नाही. परंतु सध्या करोनाचे सावट असल्याने खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेची ‘बीसीसीआय’ला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अथवा स्पर्धेदरम्यान खेळाडूंची एकंदर किती वेळा करोना चाचणी घेण्यात येणार, तसेच जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमानुसार लागू करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे यासंबंधीची माहिती ‘बीसीसीआय’ने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) आखल्यावर मिळतील.

खेळाडूंच्या कुटुंबीयांबाबत धोरण

‘आयपीएल’ ६० दिवसांपर्यंत खेळवण्यात येणार असल्याने यादरम्यान खेळाडूंना किमान दोन आठवडय़ांतून एकदा कुटुंबीयांची भेट घेता यावी, तसेच त्यांना सोबत प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काही संघमालकांनी केली आहे. याबाबत ‘बीसीसीआय’ कोणती भूमिका घेते, हे रविवारी स्पष्ट होईल.

वेळापत्रक नि सामन्यांचे आयोजन

स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. शनिवार-रविवारी प्रत्येकी दोन सामने खेळवण्याबरोबरच सुरक्षित अंतराच्या नियमाचे भान राखण्यासाठी प्रत्यक्षात मैदानावर खेळाडूंसह संघ व्यवस्थापनातील किती जणांना प्रवेश देण्यात येईल, याचे उत्तर रविवारी मिळण्याची शक्यता आहे.

विदेशी खेळाडूंचे काय?

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ‘आयपीएल’साठी उशिराने अमिरातीत दाखल होणार आहेत. मात्र दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंबाबत ‘बीसीसीआय’ कोणते धोरण आखणार, हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरेल. आफ्रिकेतील करोनाची स्थिती भयावह आहे, तर विंडीजची कॅरेबियन प्रीमियर लीग १० सप्टेंबरला संपणार आहे.

या मुद्दय़ांवरही चर्चा

अमिराती क्रिकेट मंडळ ‘आयपीएल’च्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यासाठी उत्सुक आहे. यासंबंधी ‘बीसीसीआय’ने सावध पावित्रा स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे ‘आयपीएल’चे शीर्षक प्रायोजकत्व असलेल्या व्हिवोच्या करारबाबत ‘बीसीसीआय’ कोणता निर्णय घेणार, यासंबंधीही प्रशासकीय समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:21 am

Web Title: ipls future decided today abn 97
Next Stories
1 कोहलीची पाकिस्तानविरुद्धची खेळी सर्वोत्तम -गंभीर
2 यशस्वी आघाडीवीर होण्यासाठी मनातील आवाज महत्त्वाचा -भूतिया
3 देवराम भोईर यांचे राज्य कबड्डी संघटनेवरील उपाध्यक्षपद संपुष्टात
Just Now!
X