हनुमा विहारीच्या शतकानंतरही शेष भारतचा पहिला डाव ३३० धावांवर संपुष्टात

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा

नागपूर : विदर्भाला दुसऱ्यांदा रणजी करंडकाचे जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या विदर्भाच्या फिरकीपटूंनी इराणी करंडकातही आपला जलवा कायम ठेवला. अक्षय वखरे, आदित्य सरवटे आणि अक्षय कर्णेवार या विदर्भाच्या फिरकीपटूंनी पहिल्याच दिवशी वर्चस्व गाजवल्यामुळे शेष भारत संघाचा पहिला डाव ३३० धावांवर संपुष्टात आला.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मदानावर मंगळवारपासून सुरू झालेल्या पाचदिवसीय इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सत्रात शेष भारताने वर्चस्व गाजवल्यानंतर विदर्भाच्या गोलंदाजांनी अखेरच्या दोन सत्रांत दमदार पुनरागमन करून नऊ गडी बाद केले. मयांक आणि हनुमा विहारीने शतकी भागीदारी करत शेष भारताला चांगल्या स्थितीत आणण्यात मोलाची कामगिरी बजावली. हनुमा विहारीने दमदार शतक ठोकत शेष भारत संघाचा डाव सावरला. मयांक अगरवालचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. या दोघांच्या दमदार कामगिरीनंतरही शेष भारतचे अव्वल फलंदाज या सामन्यात अपयशी ठरले.

शेष भारत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मयांक अग्रवाल अनमोलप्रीत सिंगने शेष भारताला बऱ्यापैकी सुरुवात करून दिली. वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीने अनमोलप्रीतचा त्रिफळा उडवून विदर्भला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हनुमा विहारीने मयांकच्या साथीने विदर्भाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर मयांकने आपले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २३वे अर्धशतक पूर्ण केले.

उपाहारापर्यंत १ बाद १४२ अशा चांगल्या स्थितीत असताना यश ठाकूरने शेष भारतला दुसरा धक्का दिला. शतकाच्या उंबरठय़ावर असलेल्या मयांकला यशने माघारी पाठवले. मयांकने १३४ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने विहारीने संयमी खेळी साकारत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर शेष भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेकडून मोठी खेळीची अपेक्षा होती. मात्र आदित्य सरवटेने त्याची खेळी १३ धावांवर संपुष्टात आणली.

दुसऱ्या सत्रात चार गडी बाद करून विदर्भाने सामन्यात शानदार पुनरागमन केले. विहारीने एका बाजूने चिवट खेळी करत आपले १६वे शतक साजरे केले. त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही. कृष्णाप्पा गौथम, धर्मेद्र जडेजा, इशान किशन स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर राहुल चाहर आणि विहारीने ४८ धावांची भागीदारी रचली. तळातील फलंदाज अंकित राजपूतने २५ धावा जोडल्या. महत्त्वाच्या सामन्यात उमेश यादव वैयक्तिक कारणामुळे खेळू शकला नाही, तर वासिम जाफरला पाठीच्या त्रासामुळे विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळे अथर्व तायडे आणि यश ठाकूरला संघात स्थान मिळाले.

संक्षिप्त धावफलक

शेष भारत (पहिला डाव) ८९.४ षटकांत सर्व बाद ३३० (मयांक अगरवाल ९५, अजिंक्य रहाणे १३, श्रेयस अय्यर १९, हनुमा विहारी ११४; अक्षय वखरे ३/६२, आदित्य सरवटे ३/९९, रजनीश गुरबानी २/५८, अक्षय कर्णेवार १/५०)

आमच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत. गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सामन्यात पुनरागमन करू शकलो. क्षेत्ररक्षणात ढिसाळपणा जाणवला. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक नसून चेंडू संथगतीने येत आहे. बुधवारी आम्हाला फलंदाजीत चांगली सुरुवात करावी लागेल. सलामीवीरांची मोठी भागीदारी झाल्यास शेष भारत अडचणीत येऊ शकतो. अजिंक्य रहाणेसाठी विशेष रणनीती आखली होती, त्या जाळ्यात तो अलगदपणे फसला.

– अक्षय वखरे, विदर्भाचा गोलंदाज