स्टुअर्ट बिन्नीपाठोपाठ सी.एम.गौतमनेही शतक झळकावल्यामुळे इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत शेष भारताविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात कर्नाटकला ६०६ धावांचा डोंगर उभारता आला. प्रत्युत्तरादाखल शेष भारतीय संघाची दुसऱ्या डावात ३ बाद ११४ अशी स्थिती असून ते अजूनही २९१ धावांनी पिछाडीवर आहेत. बिन्नीला (१२२) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फक्त सात धावा करता आल्या. पण गौतमने दमदार फलंदाजीचा नमुना पेश करत १७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १२२ धावांची खेळी साकारली. शेष भारताच्या संघाकडून पंकज सिंगने सहा बळी मिळवले. दुसऱ्या डावातही गौतम गंभीर (७) सपशेल अपयशी ठरला. कर्नाटकचा कर्णधार वियन कुमारने पुन्हा एकदा भेदक मारा शेष भारताच्या दोन्ही कर्णधारांना २० धावांमध्ये तंबूत धाडले. पण बाबा अपराजितने (नाबाद ४२) संघाला सावरत शतकासमीप धावसंख्या पोहोचवली, त्याला केदार जाधवची (४४) चांगली साथ मिळाली, पण केदारला अर्धशतक पूर्ण करता आले नाही.