नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळवण्यात आलेल्या इराणी चषकाच्या सामन्यात, विदर्भाने शेष भारतावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. विदर्भाने उभारलेल्या ८०० धावसंख्येला उत्तर देताना शेष भारताने पहिल्या डावात ३९० धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या दिवशी विदर्भाने दुसऱ्या डावात बिनबाद ७९ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर हा सामना अनिर्णीत अवस्थेकडे झुकल्याचं निश्चीत झालं. यानंतर पहिल्या डावातील ४१० धावांच्या भक्कम आघाडीच्या जोरावर विदर्भाला इराणी करंडकाचं विजेतेपद बहाल करण्यात आलं.

या सामन्यावर विदर्भाने फलंदाजी आणि गोलंदाजीतून आपलं वर्चस्व कायम ठेवलं. वासिम जाफरच्या २८६ धावा, त्याला गणेश सतीश, अपुर्व वानखेडे यांनी शतकी खेळी करुन दिलेली साथ आणि सलामीवीर फैज फजल-संजय रामास्वामी जोडीच्या अर्धशतकी खेळीने विदर्भाने ८०० धावांचा डोंगर उभा केला. वासिम जाफरने तब्बल ४३१ चेंडूंचा सामना करत ३४ चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने २८६ धावा पटकावल्या. इराणी करंडकातला तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रातला खेळ पाऊस व अंधुक प्रकाशामुळे वाया गेला.

विदर्भाने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना शेष भारताच्या डावाची सुरुवात काही चांगली झाली नाही. सलामीवीर आर. समर्थला रजनीश गुरबानीने भोपळाही न फोडता बाद केलं. यानंतर मयांक अग्रवाल, करुण नायर हे खेळाडू फारशी चमक दाखवू शकले नाही. मात्र मुंबईकर पृथ्वी शॉने विदर्भाच्या गोलंदाजीचा सामना करत ५१ धावांची खेळी केली. मात्र पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर हनुमा विहारी आणि जयंत यादव शतकी भागीदारी रचत शेष भारताचा डाव सावरला. हनुमा विहारीने विदर्भाच्या गोलंदाजीचा सामना करत शेष भारताचा लढा कायम ठेवला. या खेळीदरम्यान विहारीने १८३ धावांची शतकी खेळीही केली. दुसऱ्या बाजूने जयंत यादवने ९६ धावा करत हनुमा विहारीला चांगली साथ दिली. यानंतर तळातल्या फलंदाजांना झटपट बाद करत विदर्भाने शेष भारताचा डाव ३९० धावांवर संपवला.

दुसऱ्या डावात संजय रामास्वामी आणि अक्षय वाडकरने विदर्भाला बिनबाद ७९ धावांपर्यंत मजल मारुन दिली, आणि सामना अनिर्णीत राहण्यार शिक्कामोर्तब झालं. मात्र पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर विदर्भाला या सामन्यात विजेता घोषीत करण्यात आलं.