अनुभवी खेळाडू वासिम जाफरने झळकावलेलं द्विशतक आणि त्याला दुसऱ्या बाजूने गणेश सतीशने शतकी खेळी करुन दिलेली साथ, या जोरावर विदर्भाने इराणी करंडक सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस विदर्भाने ३ गड्यांच्या मोबदल्यात ५९८ धावांपर्यंत मजल मारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गणेश सतीश माघारी परतल्यानंतर वासिम जाफर २८५ धावांसह मैदानावर अजुनही तळ ठोकून उभा आहे.

पहिल्या दिवसाप्रमाणेच सलग दुसऱ्या दिवशीही शेष भारताच्या गोलंदाजांना अपयशाचा सामना करावा लागला. वासिम जाफर आणि गणेश सतीश जोडीने तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. अखेर सिद्धार्थ कौलने गणेश सतीशला बाद करत विदर्भाची जमलेली जोडी फोडली. दरम्यान आज दिवसभराच्या खेळीत वासिम जाफरने दोन विक्रम आपल्या नावावर जमा केले आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वासिम जाफरने १८ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा वासिम सहावा फलंदाज ठरलेला आहे. वासिमच्या खात्यावर दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस १८ हजार २ धावा जमा आहेत. या यादीत सुनिल गावसकर २५ हजार ८३४ धावांसह पहिल्या स्थानावर आहेत. याचसोबत वयाच्या चाळीशीत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वासिम जाफरने पाचवं स्थान पटकावलं आहे. या विक्रमी खेळीनंतर सर्व स्तरातून वासिम जाफरचं कौतुक होतं आहे.