डब्लिन : कारकीर्दीतील दुसराच एकदिवसीय सामना खेळणाऱ्या अबू झायेदने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर बांगलादेशने तिरंगी क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात आर्यलडला सहा गडी व ४२ चेंडू राखून धूळ चारत अंतिम फेरी गाठली.

या विजयासह बांगलादेशने चार सामन्यांतील तीन विजयांसह गुणतालिकेत प्रथम क्रमांक मिळवला. शुक्रवारी त्यांची दुसऱ्या क्रमांकावरील वेस्ट इंडिजशी (चार सामन्यांत दोन विजय) अंतिम सामना होईल.

प्रथम फलंदाजी करताना पॉल स्टर्लिगने साकारलेल्या १३० धावांच्या शतकी खेळीला कर्णधार विल्यम्स पोर्टरफिल्डची (९४) सुरेख साथ लाभली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी तब्बल १७४ धावांची भागीदारी रचली. मात्र झायेदच्या गोलंदाजीपुढे इतर फलंदाजांनी शरणागती पत्करल्यामुळे आर्यलडने ५० षटकांत ८ बाद २९२ धावांपर्यंत मजल मारली.

प्रत्युत्तरात तमिम इक्बाल (५७), लिटन दास (७६) आणि शकिब अल हसन (५०) या तिघांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशने निर्धारित लक्ष्य ४३ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.

संक्षिप्त धावफलक

आर्यलड : ५० षटकांत ८ बाद २९२ (पॉल स्टर्लिग १३०, विल्यम पोर्टरफिल्ड ९४; अबू झायेद ५/५८) पराभूत वि. बांगलादेश : ४३ षटकांत ४ बाद २९४ (लिटन दास ७६, तमिम इक्बाल ५७; बॉएड रँकिन २/४८)

’ सामनावीर : अबू झायेद