करोना विषाणूच्या भीषण स्थितीमुळे देशातील वैद्यकीय यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्यामुळे अनेकजण विविध पद्धतीने आपली मदत पाठवत आहेत. भारतातील क्रिकेटपटूंनीही देणगी दिली आहे. यात इरफान पठाणने मदतीची घोषणा केली आहे. इरफान सोशल मीडियातून मिळणारी पूर्ण रक्कम करोनाग्रस्तांसाठी चॅरिटीला देणार आहे.

इरफान आणि युसुफ यांनी आतापर्यंत ९०,००० कुटुंबांना मदत केली आहे. इतकेच नव्हे तर पठाण क्रिकेट अकादमीतर्फे दक्षिण दिल्लीतील करोनाग्रस्तांना मोफत भोजनही दिले गेले आहे. त्यांचे वडील चॅरिटेबल ट्रस्टच्या करोना रूग्णांनाही भोजन पुरवित आहेत.

गेल्या वर्षीही केली होती मदत

गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसूफ पठाण मदतीसाठी पुढे आले होते. गरजूंना अन्न पुरवण्याव्यतिरिक्त त्यांनी वडोदरामध्ये ४००० मास्क वितरित केले. याशिवाय प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वडोदरा पोलिसांना व्हिटॅमिन सीच्या गोळ्याही वाटण्यात आल्या होत्या.

२०१८मधील केरळमधील पूरसंकटादरम्यान पठाण बंधुंनी राज्यातील पीडित लोकांसाठी औषधे, अन्न, कपडे, चप्पल, लुंगी, ब्लँकेट इ मूलभूत गरजांसह इतर सामग्रीची व्यवस्था केली होती. महत्त्वाचे म्हणजे करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी बरेच लोक क्रिकेट जगतातून पुढे आले आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, परदेशी खेळाडू आणि क्रिकेट बोर्डानेही देणगी दिली आहे.