भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने सर्वोत्तम भारतीय कर्णाधार म्हणून राहुल द्रविडचे नाव घेतलं आहे. एकीकडे महेंद्र सिंग धोनी आणि सौरभ गांगुलीसारख्या कर्णधारांना भारतीय क्रिकेट इतिहासामधील सर्वोत्तम कर्णधार म्हटले जात असतानाच पठाणने मात्र राहुलचं नाव घेण्यामागे एक खास करणार असल्याचं सांगितलं आहे. इतकचं नाही तर राहुलसाठी आपण जीव द्यायलाही तयार असल्याचं मत इरफानने व्यक्त केलं आहे.

इरफान पठाणने २००३ साली सौरभ गांगुली कर्णधार असतानाच भारतीय क्रिकेट संघात प्रवेश केला. त्यानंतर २००४ ते २००७ द्रविडने ११ कसोटी सामने आणि ३७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं. २००७ साली इरफानसहीत भारतीय संघ विश्वचषक स्पर्धाही द्रविडच्या नेतृत्वाखालीच खेळला. द्रविड हा सतत खेळाडूंशी चर्चा करायचा. त्यामुळे याचा खेळाडूंना फायदा व्हायचा असं इरफान सांगतो. २००७ साली भारत गट फेरीमध्येच विश्वचषक स्पर्धेबाहेर पडला होता. श्रीलंका आणि बांग्लादेशकडून झालेल्या पराभवामुळे भारत स्पर्धेमध्ये फार काळ टिकू शकला नाही. याच विश्वचषकाच्या आठवणींना इरफानने नुकताच एका मुलाखतीमध्ये उजाळा दिला. त्यावेळी त्याने द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळता मैदानावरील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतल्याचे इरफानने सांगितले.

“दादा (सौरभ गांगुली) माझा पहिला कर्णधार होता. त्याने मला भरपूर पाठिंबा दिला. अनिल कुंबळेनेही भारतीय संघाचे आणखीन काही सामन्यांमध्ये चांगले नेतृत्व केले असते. धोनीने तर कर्णधार म्हणून सर्वकाही मिळवलं आहे. मात्र असं असलं तरी मला द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळायला जास्त आवडायचं. यामागील मुख्य कारण म्हणजे द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळताना तो प्रत्येक खेळाडूनशी योग्य पद्धतीने संवाद साधायचा,” असं मत इरफानने ‘स्पोर्टस तक’शी इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये बोलताना व्यक्त केलं.

२००७ साली विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ अनपेक्षितपणे बाहेर पडल्यानंतर संयम राखण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या द्रविडची खरी कसोटी होती. मात्र त्यावेळेसही त्याने खेळाडूंवर ताण येऊ नये याची काळजी घेतली. द्रविड संघातील सर्व खेळाडूंना थोडं हलकं वाटावं म्हणून चित्रपट पहायला घेऊन गेला होता. त्यावेळी माझ्याबरोबरच तरुण धोनीही संघामध्ये होता अशी आठवण इरफानने सांगितली. “२००७ मध्ये आम्ही विश्वचषक स्पर्धेतून बाहेर गेल्याने निराश होऊन आमच्या आमच्या रुममध्ये बसलो होतो. त्याचवेळी त्याने सर्वांना फोन केला आणि आपण थ्री हड्रेड चित्रपट पहायला जात असल्याचं आम्हाला सांगितलं,” असं इरफान म्हणाला. “अनेकजण द्रविडच्या नेतृत्वाबद्दल बोलतच नाही. आम्ही त्याच्या नेतृत्वाखाली खेळतानाच धावांचा विक्रमी पाठलाग केला होता,” अशी आठवही इरफानने द्रविडच्या नेतृत्व गुणांबद्दल बोलताना सांगितली.

इरफानने त्याला आणि धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी वाटचाल करण्यासाठी द्रविडने कशाप्रकारे प्रेरणा दिली यासंदर्भातही माहिती दिली. द्रविडने दिलेल्या प्रेरणेमुळे आम्हाला आमच्या क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी फायदा झाला. द्रविडने आम्हाला पराभवाचे दु:ख आणि निराशा विसरण्यासाठी मदत केली असंही इरफानने सांगितलं.

“इरफान हा जगाचा अंत नाही. तू सध्या खूप क्रिकेट खेळत आहेस आणि भविष्यातही खेळशील. आपण हारलो हे दुर्देवीच आहे. मात्र तू आणि धोनी भारतीय संघासाठी खूप काळ क्रिकेट खेळाल, असं द्रविड मला म्हणाला होता. त्याच्या त्या शब्दांमुळे आम्हाला ऊर्जा मिळाली होती,” असं इरफानने सांगितलं. द्रविडने त्याच्या कारकीर्दीमध्ये २५ कसोटी सामने आणि ७९ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं.