म्यानमार मधील रोहींग्या मुस्लीम समाजाबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी इरफान पठाणला ट्विटवर पुन्हा एकदा ट्रोल व्हावं लागलं आहे. सध्या रोहींग्या मुसलमान समाज आणि म्यानमार सरकार यांच्यात प्रचंड तणाव सुरु आहे. यातून निर्माण झालेल्या हिंसाचारात अनेक मुस्लीम समाजातील नागरिकांची घर जाळण्यात आली. यामुळे काही लोकांनी निर्वासित होऊन बांगलादेश आणि इतर देशांत आश्रय घेतला आहे.

या सर्व प्रकाराबद्दल भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट टाकलं. “जगातील सर्व नागरिकांनी असं ठरवुन टाकलंय की आम्हाला शांतता नकोय. माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू होऊन बसलेला आहे.”

अवश्य वाचा – ‘राखी’मुळे इरफान ‘धर्मसंकटात’, कट्टरपंथियांनी पुन्हा साधला निशाणा

वास्तविक पाहता म्यानमार मध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर इरफानने भाष्य केलं. मात्र नेटीझन्सनी यावेळीही त्याला चांगलंच ट्रोल केलं.

अनेक नेटीझन्सही इरफानला बकरी ईद, काश्मिरी पंडीत यांच्या मुद्द्यावर प्रश्न विचारत भंडावून सोडलं. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रेटी किंवा क्रिकेटपटूने काही विषयावर वक्तव्य करण्याचं ठरवल्यास त्याला अशा ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. याआधीही आपल्या बायकोसोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर, राखी बांधल्यानंतर इरफानला अशाच प्रकारे ट्रोल व्हावं लागलं होतं. मात्र प्रत्येक वेळी इरफान या ट्रोलर्सना पुरून उरला आहे.

अवश्य वाचा – तुला हे वागणं शोभतं का? इरफान पठाणचं चाहत्यांकडून ट्रोलिंग