जसप्रीत बुमराह हा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजीची भिस्त बहुतांश वेळा बुमराहवरच असते. बुमराहने आपल्या कामगिरीने कायम स्वत:ला सिद्ध केले आहे. पण पाकिस्तानचा अष्टपैलू गोलंदाज अब्दुल रझाक याला मात्र बुमराहचे गोलंदाजीतील श्रेष्ठत्व मान्य नाही. “बुमराह हा बच्चा गोलंदाज आहे. माझ्या काळी जर बुमराह गोलंदाजी करत असता, तर मी त्याच्या गोलंदाजीवर सहज फटकेबाजी केली असती”, असे अब्दुल रझाक म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यावर भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण याने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

“बुमराह ‘बच्चा’ आहे, त्याची गोलंदाजी मी सहज ठोकून काढली असती…”

“इरफानसारखे गोलंदाज आमच्या पाकिस्तानात गल्ली-गल्लीत सापडतात (असे म्हटले होते.) जेव्हा जेव्हा हा गल्ली बॉलर त्यांच्यासमोर मैदानात खेळायला उतरला, तेव्हा या बॉलरने त्यांचे त्रिफळे उडवले. त्यामुळे माझी सर्व चाहत्यांना विनंती आहे की कोणीही या (रझाकच्या) अतिरंजीत कमेंटकडे लक्ष देऊ नका. फक्त वाचा आणि हसत रहा”, असे ट्विट करत इरफानने रझाकच्या सणसणीत शाब्दिक चपराक लगावली.

रझाकने काय उधळली होती मुक्ताफळं?

“मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा माझ्यासमोर जगातील सर्वोत्तम गोलंदाज गोलंदाजी करायचे. मी भल्या-भल्या गोलंदाजांसमोर फलंदाजी केली आहे. त्यामुळे बुमराहचे कौतुक मला सांगू नका. जर तो माझ्यावेळी गोलंदाजी करत असता, तर कामगिरीचे दडपण त्याच्यावर असते. मी तर त्याची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती. मी माझ्या काळात ग्लेन मॅकग्रा आणि वसीम अक्रम यांच्या सारख्या गोलंदाजांसमोर खेळलो आहे. माझ्यासाठी बुमराह एकदम ‘बच्चा’ आहे”, अशी दर्पोक्ती अब्दुल रझाकने केली होती.

“जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला खूप चांगली कामगिरी करताना दिसतो आहे. त्याने स्वत:मध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. त्याची गोलंदाजीची शैली काहीशी विचित्र आणि वेगळी आहे. त्यातच चेंडूच्या सीमचा (शिवणीचा) योग्य वापर कसा करावा हे त्याला ठाऊक आहे. त्यामुळेच तो खूप परिणामकारक गोलंदाज ठरतो. पण मी माझ्या काळात अनेक प्रतिभावान आणि वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यामुळे माझ्या वेळी बुमराह असता, तर मला गोलंदाजी करताना बुमराहवरच दडपण आले असते. मी त्याच्या गोलंदाजीवर सहज चौकार-षटकार खेचले असते, असे रझाक म्हणाला होता.