भारतीय संघातून बाहेर फेकला गेलेला अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना आणि माजी खेळाडू इरफान पठाने बीसीसीआयकडे एक खास मागणी केली आहे. जे खेळाडू भारताच्या संघात आपलं स्थान टिकवण्याच्या शर्यतीमध्ये नाहीयेत, त्यांना परदेशी टी-२० लिगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात यावी. ते Instagram Live Chat मध्ये बोलत होते.

“भारतीय खेळाडूंना परदेशी टी-२० लिगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली अशी माझी इच्छा आहे. बीसीसीआयने यावर विचार करायला हरकत नाही. किमान दोन वेगळ्या लिगमध्ये खेळण्याची परवानगी मिळायला हवी, जर बाहेरच्या देशातील स्पर्धेत आम्ही चांगली कामगिरी केली तर हे आमच्यासाठीच चांगलं असणार आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूने अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय संघात पुनरागमन केलं आहे.” सुरेश रैनाने आपली बाजू मांडली.

इरफान पठाणनेही सुरेश रैनाची री ओढली. “प्रत्येक देशातील खेळाडूंची विचार करण्याची एक वेगळी पद्धत असते. मायकल हसीने २९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघाकडून पदार्पण केलं. भारतात कोणताही खेळाडू असा विचार करु शकेल असं मला नाही वाटत, जो पर्यंत तुम्ही शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त आहात तुम्ही देशासाठी खेळत राहणं गरजेचं आहे. ज्या खेळाडूंचं वय ३० आहे आणि जे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत नाही असं तुम्हाला वाटतं त्यांना परदेशी टी-२० लिग खेळण्याची परवानगी मिळाली पाहिजे.” इरफानने आपलं मत मांडलं.

आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्याशिवाय बीसीसीआय आपल्या कोणत्याही खेळाडूला परदेशी टी-२० लिगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. गेल्या वर्षी युवराज सिंहने कॅनडातील ग्लोबल टी-२० स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यामुळे परदेशी टी-२० लिगमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.