चौकशी, चौकशी अन् चौकशी, निर्णय होईल तेव्हा होईल!
पुरस्कारांचे  गौडबंगाल  – भाग – ४
महाराष्ट्राच्या क्रीडा खात्यातील प्रभावशाली उपसंचालक माणिक ठोसरे, हे आशियाई बेंच स्पर्धेत दुसरे (आणि ‘अर्थ’पूर्ण बाब म्हणजे दुसऱ्या क्रमांकामुळे रौप्य पदकाचे व त्या ओघात एक  लाख रुपये इनामाच्या शिवछत्रपती पुरस्काराचे दावेदार), की नियमांनुसार सहा नव्हे तर मोजक्या दोनच स्पर्धकांत दुसरे (व त्यामुळे पुरस्कारासाठी, मुख्य म्हणजे एक लाख रु. इनामासाठी अपात्र!), की शेवटून पहिले?
तसेच, गुरू माणिक ठोसरे यांच्या पावलांवर पावले टाकण्याचा प्रशंसनीय कित्ता गिरवणाऱ्या, ठाणे जिल्ह्य़ातील शासकीय अधिकारी दीपाली कुलकर्णी या तर, आशियाई स्पर्धेतील एकमेव स्पर्धक म्हणून पहिल्या सुवर्णपदकाच्या मानकरी (आणि त्या ओघात छत्रपती खेळाडू पुरस्काराच्या एक लाख रु. इनामाच्या मानकरी), की स्पर्धेत दुसरा खेळाडूच नसल्यामुळे सुवर्णपदकास व (अरेरे!) एक लाख रु. पुरस्कारास अपात्र? म्हणजे त्या एकाच वेळी पहिल्या, तसेच शेवटूनही पहिल्या?
अशा बिकट प्रश्नांनी गरीब बिचाऱ्या, माननीय क्रीडामंत्री विनोदजी तावडे यांना भंडावून सोडलंय. आपल्या खात्यातील माणिक ठोसरे व दीपाली कुलकर्णी या बापडय़ा कर्मचाऱ्यांवर काडीचाही अन्याय होऊ नये, यासाठी विनोदजी हे प्रकरण पुन्हा पुन: तपासून पाहत आहेत. प्रश्न आहे एकेक लाखाचा. त्यात वाटेकरी असोत वा बहुधा नसोतच, तरीही एकेक-एकेक असा दोन लाखांचा. महागाईच्या या जमान्यात ठोसरे-दीपालीजी त्यावर महिनाभर तरी गुजराण करू शकतीलच की. असं म्हणतात की, हे प्रकरण कस्सून तपासण्यासाठी, माननीय विनोदजींनी सतरांदा चष्मे बदलले व वेगवेगळ्या नजरेतून व्यवस्थित पाहणी-तपासणी केली.
पण माननीय विनोदजींच्या या कर्तव्यदक्षतेची कदर कुठे ठेवली जाते? कोणीएक सलाऊद्दीन अन्सारी उठले आणि त्यांनी माननीय विनोदजींना पत्र खरडले. ती गोष्ट १७ एप्रिल २०१५ची. अन्सारींना दुसरा कामधंदा दिसत नाही. अन्सारींनी फक्त १७० दिवस वाट पाहिली. किती दिवस? केवळ १७० दिवस. अन्सारींनी साधा विचार करून बघावा. महाराष्ट्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी माननीय विनोदजींनी पंधरा-वीस वर्षे वाट पाहिली, व्रतस्थ कार्यकर्त्यांसारखी, पण अन्सारींनी विनोदजींना दुसरं पत्र खरडलं आठ ऑक्टोबरला. केवढी घाई, इथेच अन्सारी उतरतात तुमच्या-माझ्या नजरेत.
स्वत:ला समजतात काय अन्सारी? कोण हे अन्सारी? माननीय विनोदजींना पाठवलेल्या पत्रात ते आपली ओळख करून देतात : ‘वय वर्षे ४५. गेली २५ वर्षे कराटे प्रशिक्षक. कराटेतील राष्ट्रीय विजेते. आशियाई क्रीडा स्पध्रेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे पहिले कराटेपटू.’ एवढय़ा किरकोळ कर्तृत्वाच्या आधारावर, माननीय विनोदजींचा अमूल्य वेळ ते खर्ची पाडत आहेत.
विनोदजींच्या क्रीडा खात्यातील ठोसरे व कुलकर्णी या गरीब-बापडय़ा कर्मचाऱ्यांवर, कोणते आरोप ठेवण्याची हिंमत अन्सारींनी दाखवली आहे? लक्षवेधी ठळक अक्षरातील हे आरोप आहेत : ‘चीटिंग (फसवणूक), फॅब्रिकेशन (बनवाबनवी), क्रिमिनल मिसरिप्रेझेंटेशन (गुन्हेगारी स्वरूपाचे चुकीचे प्रतिनिधित्व), क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी (गुन्हेगारी स्वरूपाचे कट-कारस्थान).
सर्वप्रथम बघू या ठोसरे-दीपाली यांची कामगिरी- माणिक ठोसरे हे हाँगकाँगमधील २००८च्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत दुसरे व रौप्य पदकाचे दावेदार आणि दीपाली कुलकर्णी ‘सर्व’प्रथम व सुवर्णपदकाची दावेदार. दोघांचे लक्ष्य होते अर्थातच छत्रपती पुरस्कार, किंबहुना एक लाख रुपयांचा (अगदी तोंडाला पाणी सुटलेला) पुरस्कार. उघडच आहे, शिवछत्रपती पुरस्कार एक लाखाचा नसता व शून्य इनामाचा असता, तर ते दोघे बिचारे असल्या भानगडीत कशाला पडले असते? असो.
आता शिवछत्रपती पुरस्कार (खेळाडू) नियमावलीकडे वळू या. नियम-२०१२मधील नियम क्रमांक चार, पात्रतेचे निकष (७) सांगतो : ‘जागतिक, आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धामध्ये किमान सहा देश सहभागी असतील, अशाच स्पर्धाचा विचार व्हावा.’
पण आमच्या वयोगटात सहा स्पर्धक तर सोडाच, पण ठोसरेंच्या वयोगटात केवळ दोनच व दीपाली कुलकर्णीच्या खुल्या वयोगटात केवळ त्या एकटय़ाच स्पर्धक होत्या. राज्य सरकारच्या सेवेतील या दोघा कर्मचाऱ्यांनी सरकारची केलेली फसवणूक गुन्हेगारी स्वरूपाची नव्हे का? २००९-१०च्या सुमारास त्यांनी पुरस्कार ढापले. हा गुन्हा मागील सरकारच्या काळातला, तेव्हा बहुधा माननीय पद्माकरजी वळवी क्रीडामंत्री असावेत.
याबाबत शासनाने नेमली त्रिसदस्य चौकशी समिती. सहसंचालक नरेंद्र सोपल, उपसंचालक मोटे व साहाय्यक संचालक कविता लवंडे यांनी दीपाली व तक्रार नोंदवणारे अन्सारी या दोघांची निवेदने नोंदवली. आपण एकटीच स्पर्धक होतो, असा लेखी कबुलीजबाब दीपालीने दिला, असे सांगितले जाते. पण ठोसरेंनी मात्र या प्रश्नास बगल देण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेत एकंदर दोनशेपेक्षा जास्त खेळाडू उतरले होते, असा फसवा युक्तिवाद ते करत राहिले. शेवटी त्यांना समज दिली गेली : तुमच्या वयोगटात तुमच्यासह दोनच स्पर्धक होते ना? तुम्ही शेवटून दुसरे होतात ना? त्यावर ते चूपच होते! चूपच असणार!
ठोसरे यांच्या गौडबंगालाचे पैलू तर बघा. चौकशी समितीपुढे बालेवाडीत ३ नोव्हेंबर २०१५ला, अन्सारींनी केलेले आरोप व ठोसरेंचे खुलासे यांचा धावता आढावा तर बघा-
१. हाँगकाँगमधील कोणत्या वयोगटाच्या बेंच प्रेस स्पर्धेत तुम्ही दुसरे (म्हणजे तळापासून पहिले) आलात?
खुलासा (ठोसरे) : वरिष्ठ ऊर्फ खुल्या स्पर्धेत.
२. पण खुल्या स्पर्धेतील पहिले दोघेही कझाकस्तानाचेच आहेत आणि बाद ठरवलेला तिसरा खेळाडू इराणी आहे. तुमचं नाव ‘खुल्या ऊर्फ वरिष्ठ’ वयोगटात नाही. आता बोला?
खुलासा : ठोसरे चूपचाप.
३. तुम्ही कोणकोणत्या वयोगटांमध्ये उतरलात, असा तुमचा दावा आहे?
खुलासा : वरिष्ठ व वयस्कर ऊर्फ मास्टर्स-२ (म्हणजे वयोगट ५० ते ६०).
४. आंतरराष्ट्रीय महासंघाच्या नियमांनुसार कोणताही खेळाडू एका स्पर्धेत एका व फक्त एकाच वयोगटात उतरू शकतो! बोला!
खुलासा : ठोसरे चूपचाप.
५. तुम्ही ‘एम-२’ म्हणजे वय ५० ते ६० या वयोगटात खेळलात. तुमचा जन्मदिनांक कोणता? तुमचा जन्मदिनांक १२ जानेवारी १९६३ असाच आहे ना? म्हणजे २००८च्या स्पर्धेत तुमचे वय ४५-४६ असावे. पण आशियाई स्पर्धेत तुम्ही जन्मदिनांक १२ जानेवारी १९५८ कसा दाखवलात? वयस्क ऊर्फ मास्टर्स एम- १ (वयोगट ४० ते ५०) पेक्षा मास्टर्स एम-२ (वयोगट ५० ते ६०) मधील वृद्धांच्या वयोगटात तुम्ही घुसखोरी केलीत, ती स्पर्धा सोपी जावी यासाठीच ना?

खुलासा : ठोसरे चूपचाप.
६. तुम्ही एम-२ ऊर्फ ५० ते ६० वयोगटात जाणीवपूर्वक २००८मध्ये खेळलात. त्यासाठी १२ जानेवारी १९५८ अशी बनावट जन्मतारीख दाखवलीत. कारण एम-२ ऊर्फ मास्टर्स-२ या वयस्करांच्या वयोगटात आणखी एकच स्पर्धक जपानमधील खराखुरा वयस्क खेळत होता.
खुलासा (ठोसरे) : मी एम-२ वयोगटात खेळलोच नव्हतो.
७. मग एम-२ वयोगटात, दोनच स्पर्धकांत जपानी खेळाडूपाठोपाठ दुसरे नाव तुमचे कसे? आणि एम-१ (वयोगट ४० ते ५०) वयोगटात खेळले म्हणता, तर त्याचे प्रमाणपत्र दाखवा.
खुलासा (ठोसरे) : एम-१चे प्रमाणपत्र सापडत नाही.
८. आशियाई स्पर्धेत माणिक ठोसरे व दीपाली कुलकर्णी यांच्या प्रमाणपत्राची अक्षरे (फॉन्ट) एकच एक शैलीतला आहे. पण इतर स्पर्धकांच्या प्रमाणपत्राची अक्षरे वेगळीच आहेत. तुमच्याच प्रमाणपत्रामध्ये ‘स्थान (प्लेस)’ हा शब्द कसा नाही? तुमच्याच प्रमाणपत्रावर नोंदणी क्रमांक कसा नाही?
खुलासा (ठोसरे) : चूपचाप.
९. आशियाई स्पर्धेला भारतातर्फे खेळण्यासाठी तुमची कोणत्या राज्य-राष्ट्रीय स्पर्धेतून निवड झाली?
खुलासा (दीपाली कुलकर्णी) : मला थेट राष्ट्रीय चाचणीला बोलावले गेले.
१०. राष्ट्रीय चाचणीचे पत्र दाखवाल? चाचणी केव्हा व कुठे झाली?
खुलासा (दीपाली) : आठवत नाही.

सवाल-जबाब किंवा सवाल-मौन तूर्त आवरते घेतो. उगाचच या सगळ्याचा त्रास, क्रीडामंत्री विनोदजी तावडे यांना होऊ नये. गेले आठ महिने ते सांगोपांग खल करत आहेत. तुम्ही-आम्ही या प्रश्नांचा निवाडा चुटकीसरशी केला असता. पण माननीय विनोदजी त्यांच्या खात्यातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी ध्यानस्थ आहेत. त्यांचे अधिकारपद किमान पाच वर्षांचे असू शकते. ते आणखी काही वर्षे ध्यानस्थ राहू शकतील.

सरतेशेवटी, दीपाली कुलकर्णीचा एक भेदक प्रतिसवाल. नियमभंग करून, तथाकथित स्पर्धेतील एकमेव स्पर्धक असून दीपालीने पुरस्कारासाठी (ठोसरेंप्रमाणे) अर्ज केला तरी कसा? असे म्हणतात, तिने प्रतिसवाल केला : ‘‘ठीक आहे, मी अर्ज केला. पण त्याची तपासणी तुम्हीच केलीत ना? पुरस्कार तुम्हीच दिलात ना?’’
गणपत माने, रमेश वीपट, माणिक ठोसरे व दीपाली कुलकर्णी (आणि बरेच सारे) एकमुखाने प्रतिप्रश्न करत आहेत : ‘अखेर पुरस्कार तुम्हीच दिलेत ना?’