News Flash

कसोटीसाठी हार्दिक पंड्याची निवड योग्य आहे का?

निवड समितीने मात्र हार्दिकच्या निवडीचे समर्थन केले आहे.

हार्दिक पांड्यामध्ये दम

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बुधवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली. निवड समितीने १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. पण यावेळी एका नावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हार्दिक पंड्या याला भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले. हार्दिकच्या समावेशावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हार्दिकची कसोटी संघात निवड का? असा सवाल देखील नेटिझन्सने उपस्थित केला. अष्टपैलू खेळाडू ही हार्दिकची जमेची बाजू असली तरी कसोटीमध्ये त्याची कामगिरी लक्षवेधी राहिलेली नाही. हार्दिकने केवळ २७.९६ च्या सरासरीने ७२७ धावा केल्या असून अद्याप त्याने एकही शतक ठोकलेले नाही. याशिवाय, ३३.७२ च्या सरासरीने त्याच्या खात्यात केवळ २२ विकेट्स जमा आहेत.

निवड समितीने मात्र हार्दिकच्या निवडीला पाठिंबा दिला आहे. पंड्याच्या गोलंदाजीच्या गतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याच्या चेंडूला स्विंग देखील आहे. याशिवाय तो चांगली फलंदाजी देखील करून शकतो, असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मत व्यक्त करून हार्दिकच्या निवडीचे समर्थन केले.

महेंद्रसिंग धोनीचा देखील संघात एक अष्टपैलू खेळाडू पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजी करणारा असावा यावर भर राहिला आहे. विराट कोहलीचेही तेच म्हणणे आहे. याआधी मागील वर्षी श्रीलंका दौऱयावर स्टुअर्ट बिन्नीचा समावेश भारतीय संघात करण्यात आला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱयात देखील त्याची निवड करण्यात आली होती. बिन्नीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण बिन्नीने उल्लेखनीय कामगिरी करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. पंड्याने नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १४० च्या वेगाने गोलंदाजी करून स्वत:ला वेगवान गोलंदाज म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघाला पंड्याकडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा असल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हार्दिक पंड्या आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करून आपली निवड सार्थ ठरवून दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. हार्दिकसाठी देखील संघातील स्थान निश्चित करण्यासाठीची नामी संधी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2016 7:59 pm

Web Title: is hardik pandya good enough to play test cricket
Next Stories
1 जाहिरात विश्वात धोनीच्या कमाईत ४७ टक्क्यांनी घट!
2 पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकाची कमाई करणाऱया दीपा मलिकला मोदींच्या हस्ते ४ कोटींचे बक्षिस
3 माझ्या मुलाने देशासाठी रक्त, घाम आणि अश्रू वाहिले आहेत, युवीच्या आईचे प्रत्युत्तर
Just Now!
X