भारतामध्ये क्रिकेट हा धर्म मानला जातो आणि क्रिकेटपटू देव .. क्रिकेटचे नाव घेतल्याशिवाय देशातल्या बऱ्याच जणांचा दिवस जात नाही.. क्रिकेट नामाचा जप अखंड चालूच असतो.. अगदी वर्षांतले ३६५ दिवस क्रिकेट बोलले, खेळले, खेळवले आणि शिकवले जाते.. सध्या भारतीय खेळाडू आणि संघ यांच्या कामगिरीच्या उतरत्या आलेखावर चर्वितचर्वण सुरू आहेच. तेही असे, की जणू या देशात दुसरा कोणताच खेळ किंवा खेळाडू नाहीत! क्रिकेटेतर खेळाडूंना क्रिकेटपटूंएवढी प्रसिद्धी, पैसा कधीच मिळाली नाही. अतिक्रिकेटमुळे जगज्जेता विश्वनाथन आनंद असो किंवा विश्वविजेत्या मेरी कोम हिच्याप्रमाणे लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून दाखविणारे खेळाडू त्यावेळेपुरते ओळखले जातात, प्रसिद्ध होतात. पण भारतात कीर्तिवान होतात फक्त क्रिकेटपटूच. सध्या क्रिकेटचा अतिरेक होत असल्याची चर्चा काही ठिकाणी रंगताना दिसत असली तरी मोठय़ा व्यासपीठावर त्याबद्दल काहीच बोलले जात नाही. हे लक्षात घेऊनच ‘दै. लोकसत्ता’ ने ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या उपक्रमांतर्गत याच गंभीर विषयाला व्यासपीठ मिळवून देण्याचे ठरविले आहे.
‘क्रिकेटचा अतिरेक होतोय का?’ हा विषय यावेळी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमात हाताळण्यात येणार आहे. क्रिकेटच्या दळणामुळे बाकी खेळांवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी या व्यासपीठावर क्रिकेट आणि अन्य खेळांमधील जाणकार मंडळी येणार आहेत. महिला विश्वचषक कबड्डी संघाच्या सदस्या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे, महाराष्ट्र नेमबाजी संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षा शीला कनुंगो, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत, झोपडीवजा घरातून आंतरराष्ट्रीय हॉकीपटू होण्याचे स्वप्न बघितलेल्या आणि ते यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवणारा युवराज वाल्मीकी या दिग्गजांचा समावेश आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून बुधवारी दुपारी ३ ते ५ वेळेत एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट येथे होणार आहे.

लोकसत्ता लाऊडस्पीकरमधील मान्यवर
युवराज वाल्मीकी (आंतरराष्ट्रीय हॉकीपटू)
दिनेश लाड (क्रिकेट प्रशिक्षक)
नीता ताटके (मल्लखांब प्रशिक्षिका आणि क्रीडा मानसोपचार तज्ञ)
भास्कर सावंत (मैदान बचाव समितीचे अध्यक्ष)
शिला कनुंगो (भारतीय नेमबाज संघाची प्रशिक्षक)
सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे (विश्ववियजी भारतीय महिला कबड्डी संघातील खेळाडू)