भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दिल्लीच्या रणजी संघातून डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे इशांतला वगळण्याचे कारण दुखापत नसून, दूरध्वनी आणि संदेशांना उत्तर न दिल्याने इशांतवर ही कारवाई करण्यात आली आहे.

‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० लढतींसाठी इशांतला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे रणजी चषक स्पर्धेत दिल्लीच्या राजस्थानविरुद्धच्या सलामीच्या लढतीसाठी इशांत उपलब्ध होऊ शकला असता. मात्र कोणत्याही दूरध्वनीला किंवा संदेशाला त्याने प्रतिसाद दिला नाही. एका आंतरराष्ट्रीय सामन्याची बंदी असताना तो प्रथम श्रेणी सामना खेळू शकतो का याचीही माहिती नसल्याने इशांतला डच्चू देण्यात आला’, असे दिल्लीचे निवड समिती प्रमुख विनय लांबा यांनी सांगितले. अनुभवी अष्टपैलू खेळाडू रजत भाटिया आणि युवा फिरकीपटू पवन नेगी यांना संघातून वगळण्यात आले आहे. धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने हरयाणाकडून खेळण्याचा निर्णय घेतल्याने दिल्लीचा संघ कमकुवत झाला आहे. गौतम गंभीर संघाचे नेतृत्त्व करणार असून, माजी खेळाडू अजय जडेजा प्रशिक्षकपदी असणार आहे.