करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका जगभरातील क्रीडा क्षेत्रालाही बसला. भारतातही BCCI सह सर्व महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपले सर्व सामने रद्द केले होते. मात्र यामधून होणारं आर्थिक नुकसान लक्षात घेता ICC आणि BCCI आता क्रिकेटचे सामने पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ICC ने खेळाडूंना सराव सुरु करण्यासाठी खास नियमावलीही आखून दिली आहे. यानुसार काही खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे. भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने काही दिवसांपूर्वी सरावाला सुरूवात केल्याचे सोशल मीडियावरून सांगितले होते. त्यानंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूने आज सरावाला सुरूवात केली.

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने आज (बुधवारी) मैदानात सरावाला सुरूवात केली. जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर तो मैदानात उतरला. इशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो आणि दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यात तो वॉर्म-अप आणि काही सामान्य स्तराचे व्यायामप्रकार करताना दिसतो आहे. “मी स्वत:ला सकारात्मकतेने व्यापून टाकतो आहे. मी सरावाला सुरूवात करत असून सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करत आहे”, असे कॅप्शन देत त्याने सराव सुरू केला आहे.

दरम्यान, भारतीय कसोटी संघाचा सर्वात भरवशाचा खेळाडू चेतेश्वर पुजाराने काही दिवसांपूर्वी सरावाला सुरुवात केली. पुजाराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फलंदाजीचा सराव करण्यासाठी पॅड बांधतानाचा फोटो पोस्ट केला. शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव या खेळाडूंनीही सरावाला सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ भारतीय क्रिकेटपटू घरात बसून असल्यामुळे त्यांनाही मैदानावर परतण्याची घाई झालेली आहे. २०२० वर्षात जानेवारी महिन्यात भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात इशांत कसोटी मालिकेत सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने चांगली केली होती, आता वर्षाअखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी इशांत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.