इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) जायबंदी झाल्याच्या कारणास्तव भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इशांतला सरावादरम्यान पोटाचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे त्याने उर्वरित ‘आयपीएल’मधून माघार घेतली होती. आता दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने वर्षअखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तो उपलब्ध नसेल, असे समजते.
जायबंदी होण्याआधी इशांत यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये फक्त एकच सामना खेळला होता. सराव करताना बरगडय़ांवर आदळल्यामुळे इशांतला ही दुखापत झाली, असे दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. ‘‘दुबईमध्ये ७ ऑक्टोबर रोजी संघाच्या सराव शिबिरादरम्यान इशांत बरगडय़ांवरच आदळला. त्याच्या पोटाचे स्नायू दुखावल्याचे तपासणीनंतर लक्षात आले. त्यामुळेच त्याला ‘आयपीएल’मधून माघार घ्यावी लागली,’’ असे दिल्लीने पत्रकाद्वारे कळवले आहे.
२०१८-१९मधील ऑस्ट्रेलियन भूमीत मिळवलेल्या ऐतिहासिक यशामध्ये इशांतने तीन कसोटी सामन्यांत ११ बळी मिळवत मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच यंदाच्या कसोटी मालिकेसाठीही त्याची निवड निश्चित मानली जात होती. आता दुखापतीमुळे त्याला संघातील स्थानाला मुकावे लागणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सामन्याची ठिकाणे निश्चित केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भारतीय संघाची घोषणा करणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 12:18 am