वेगवान गोलंदाज इशांत शर्माची उणीव प्रकर्षांने जाणवेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची अंतिम निवड करण्यात आलेली नाही, असे भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले.
भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतणार असल्यामुळे अखेरच्या तीन कसोटी सामन्यांसाठी रहाणे नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या कसोटी सामन्यात संध्याकाळच्या सत्रात गोलंदाजाचा सामना करण्याचे सर्वात मोठे आव्हान फलंदाजांसमोर असेल, असे रहाणेने स्पष्ट केले.
‘‘वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत दमदार मारा भारताकडे आहे. सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांतच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील. या दोघांव्यतिरिक्त उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज या गोलंदाजांमुळे भारताची वेगवान गोलंदाजी समतोल बनली आहे. ऑस्ट्रेलियातील वातावरणात कशी गोलंदाजी करायची, याची कल्पना त्यांना आहे. गुलाबी चेंडूच्या कसोटीने या मालिकेला सुरुवात होणार असून प्रतिस्पध्र्याचे २० बळी मिळवण्याची क्षमता भारतीय गोलंदाजांमध्ये आहे,’’ असेही रहाणेने सांगितले.
सलामीसाठी मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि लोकेश राहुल तर यष्टिरक्षणासाठी वृद्धिमन साहा आणि ऋषभ पंत हे पर्याय संघ व्यवस्थापनासमोर असतील. याविषयी रहाणे म्हणाला, ‘‘सामन्याच्या आधीच आम्ही अंतिम ११ जणांची निवड करू. बुधवारच्या सराव सत्रानंतर एकत्र बसून आम्ही अंतिम संघाच्या निवडीविषयी चर्चा करू. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनची भूमिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाजीत तसेच फलंदाजीतही तो उपयुक्त योगदान देऊ शकतो.’’
स्वत:च्या शैलीनुसार वेगवान गोलंदाजी करावी -कपिल
ऑस्ट्रेलियातील वेगवान आणि उसळत्या चेंडूंना साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवर स्वत:च्या शैलीनुसार भारताच्या वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजी करावी, असे भारताचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले आहे. ‘‘ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांवर गोलंदाजी करण्याचा अनुभव भारताच्या वेगवान गोलंदाजांकडे नाही. जेव्हा चेंडू उसळत असल्याचे गोलंदाजांच्या ध्यानात येते तेव्हा ते आखूड टप्प्याच्या चेंडूचा मारा करतात. या स्थितीत भारताच्या प्रत्येक वेगवान गोलंदाजाने स्वत:च्या शैलीनुसार आणि क्षमतेनुसार गोलंदाजी करावी. भारताचे वेगवान गोलंदाज चांगले आहेत, मात्र ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना त्यांच्या घरच्या खेळपट्टय़ांचा अधिक अनुभव आहे,’’ असे कपिल देव यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 16, 2020 12:28 am