भारतीय फुटबॉलला नवीन ओळख मिळवून देणाऱ्या ISL म्हणजेच इंडियन सुपर लिग स्पर्धेच्या चौथ्या हंगामाची घोषणा करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून चौथ्या हंगामाची सुरुवात होत असून यंदाच्या हंगामात १० संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत. याचसोबत यंदाच्या पर्वात ९५ सामने खेळवले जाणार आहेत.

दोन वेळा स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेल्या अटलॅडीको डी कोलकाता आणि मागच्या हंगामातील उप-विजेच्या केरळ ब्लास्टर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. यंदाच्या हंगामात बंगळुरु एफसी आणि जमशेदपूर एफसी या दोन नवीन संघाचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्याची तारीख आणि जागा अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीये.

या स्पर्धेतला नवीन संघ बंगळुरु एफसी आपला पहिला सामना मुंबई सीटी एफसी या संघाविरुद्ध खेळणार आहे. तर जमशेदपूर एफसी संघाचा सामना हा अटलॅडिको डी कोलकाता संघाशी होणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात नेमका कोणता संघ बाजी मारणार हे पहावं लागणार आहे.