करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक महत्वाच्या स्पर्धा रद्द होत आहेत. भारतीय फुटबॉलला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या ISL स्पर्धेचा सातवा हंगाम प्रेक्षकांविना खेळवण्याचं ठरवलंय. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत एकाच शहरात ही स्पर्धा आयोजित होणार आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता एकाच राज्यात स्पर्धेचं आयोजन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्याच्या घडीला गोवा आणि केरळ यांच्यात स्पर्धेच्या आयोजनाची चूरस असल्याचं कळतंय.

“स्पर्धेंचं आयोजन प्रेक्षकांविना केलं जाईल हे नक्की असून नोव्हेंबर ते मार्च दरम्यान स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. सुरुवातीला केरळ, गोवा, पश्चिम बंगाल आणि उत्तर पुर्वेकडील राज्यात स्पर्धेचं आयोजन करण्याबाबत विचार सुरु होता. पण सध्याच्या घडीला गोवा आणि केरळ ही दोन राज्य शर्यतीत आहेत.” ISL शी संबंधित सूत्रांनी पीटीआयला माहिती दिली. एक किंवा दोन राज्यात विविध मैदानांवर स्पर्धेचं आयोजन करण्याचा आयोजकांचा विचार आहे.

स्पर्धेच्या आयोजनाबद्दल अंतिम निर्णय घेण्याआधी खेळाडूंची सुरक्षा, सरकारचे सर्व नियम, वैद्यकीय नियम, प्रवास या सर्व गोष्टींचा आढावा घेणं आयोजकांसाठी महत्वाचं ठरणार आहे. यासोबत परदेशी खेळाडूंना संधी देण्याबाबत निर्णयांवर आयोजकांना अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे.