सध्या आलेल्या लीगच्या पिकांना सेलिब्रेटींचे खतपाणी मिळाल्यावर त्याला चांगलाच भाव येतो आणि हेच अनुकरण इंडियन सुपर लीगच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याला चार चाँद लावण्यासाठी बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन, क्रिकेटमधील माजी महान खेळाडू सचिन तेंडुलकर, उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी व मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथे १२ ऑक्टोबरला रंगणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, ही स्पर्धा २० डिसेंबपर्यंत रंगणार आहे. उद्घाटन सोहळ्यामध्ये बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि वरुण धवन हे आपली कला सादर करणार आहेत. उद्घाटन सोहळा ४५ मिनिटांच्या कालावधीमध्ये होणार असून संध्याकाळी ५ वाजता सोहळ्याला सुरुवात होईल. स्पर्धेतील संघांची मालकी प्रसिद्ध क्रिकेटपटू, बॉलीवूडचे सितारे यांच्याकडे असल्याने तेदेखील या सोहळ्याला उपस्थित असतील.
तिकिटांचे दर या वेळी २०० ते २५०० रुपयांपर्यंत ठेवण्यात येणार असून १,२०,००० हजार आसन क्षमतेचे सॉल्ट लेक स्टेडियम पूर्ण भरेल, असा आयोजकांना विश्वास आहे. आतापर्यंत ५,७०० तिकिटे ऑनलाइन विकली गेल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. जर चाहत्यांनी सहा सामन्यांची तिकिटे काढली तर त्यांना सातवा सामना मोफत दाखवण्यात येणार आहे.

मला सांगा, या सोहळ्याला कोण उपस्थित नसतील? आमच्या स्पर्धेला अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली हे सारे मान्यवर उपस्थित असणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. प्रियांका चोप्रा आणि वरुण धवन यांच्याबरोबर ५०० कलाकार उद्घाटन सोहळ्यामध्ये आपली अदाकारी पेश करणार आहेत. ही स्पर्धा चाहत्यांसाठी एक मेजवानी असणार असून त्यांचे चांगले मनोरंजन होईल.
-उत्सव पारेख, अ‍ॅटलेटिको डे कोलकाता संघाचे सहमालक

संघ              सहमालक
चेन्नई            अभिषेक बच्चन,महेंद्रसिंग धोनी
मुंबई              रणबीर कपूर
पुणे                सलमान खान
गुवाहाटी         जॉन अब्राहम<br />कोची              सचिन तेंडुलकर
गोवा            विराट कोहली
कोलकाता        सौरव गांगुली