News Flash

सप्ततारांकित मुंबईबाहेर आयएसएलचे सामने

भारतीय फुटबॉलला व्यावसायिक लीगचे कोंदण मिळवून देणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील मुंबई सिटी एफसी संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

| August 31, 2014 03:10 am

भारतीय फुटबॉलला व्यावसायिक लीगचे कोंदण मिळवून देणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील मुंबई सिटी एफसी संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या बोधचिन्हात सात ताऱ्यांचा समावेश आहे. मूळ भौगौलिक रचनेनुसार मुंबई सात बेटांची होती. या सात बेटांचे प्रतीक म्हणून सात तारे बोधचिन्हात समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र या मुंबई एफसी संघाच्या घरच्या लढती मूळ मुंबईपासून तासभर अंतरावर असणाऱ्या नवी मुंबई बेटावरील डीवाय पाटील स्टेडिमयवर होणार आहेत. त्यामुळे हा मुंबईऐवजी नवी मुंबई सिटी एफसीचा संघ म्हणणे अधिक उचित ठरेल, अशी चर्चा होती.
देशाची आर्थिक राजधानी असे वर्णन होणाऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक अशा वाहतूक, निवास अशा सर्व स्वरूपाच्या सोयीसुविधा आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे फुटबॉल स्टेडियम मुंबईत नाही, हे मुंबई सिटी एफसीच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. ‘‘नूतनीकरण करण्यात आलेल्या कूपरेज मैदानात अ‍ॅस्ट्रोटर्फ बसवण्यात आले आहे, त्याशिवाय तिथे प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता कमी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आवश्यक सुविधांची उणीव असल्याने कूपरेजऐवजी डीवाय पाटील स्टेडियमला पसंती देण्यात आली आहे, ’’ असे मुंबई सिटी एफसीचे तांत्रिक  संचालक निशांत मेहरा यांनी सांगितले.
मुंबईच्या धर्तीवर विकास व्हावा, या उद्देशाने नवी मुंबई परिसराला प्रति  मुंबई म्हणून विकसित करण्यात आले. नियोजित शहरे, क्रीडांगणे-जिमखाना-क्लब्स यासाठी राखीव जागा, क्रीडापटूंना प्रोत्साहन देणाऱ्या शाळा आणि महाविद्यालये अशा क्रीडा संस्कृतीला पोषक वातावरणामुळे नवी मुंबईने मुंबईवर बाजी मारल्याचे मुंबई सिटी एफसीच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.
बोधचिन्हाच्या अनावरणाला संघाचे मालक रणबीर कपूर आणि बिमल पारेख यांच्यासह रणबीरचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर, आयएमजी-रिलायन्सच्या नीता अंबानी उपस्थित होते.
‘‘आयएसएलच्या निमित्ताने मी नव्या क्षेत्रात पाय रोवला आहे. पैशाचा योग्य विनियोग करून अव्वल संघ तयार करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’’ असे सहमालक बिमल पारेख यांनी सांगितले.
मुंबई एफसी संघासाठी गुंतवणुकीचा तपशील विचारल्यानंतर रणबीर आणि बिमल यांनी खेळाच्या आवडीसाठी गुंतवणूक केल्याचे सांगत मूळ प्रश्नाला बगल दिली. ‘‘मी या संघाचा सदिच्छा दूत नाही तर मालक आहे, मी वैयक्तिक पैसा तसेच वेळ देणार आहे,’’ असे रणबीरने स्पष्ट  केले.
“मुंबई शहराची गुणवैशिष्टय़े या संघात प्रतित होतील. दर्जात्मक फुटबॉल हे आमचे उद्दिष्ट आहे. युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी शहरातील शंभराहून अधिक शाळांशी संपर्क करण्यात आला आहे. माझ्या प्रतिमेचा संघाला उपयोग झाला तर आवडेल, मात्र माझ्यापेक्षा संघातील खेळाडूंचा ब्रँड निर्माण झाला तर ते जास्त आवडेल,”
– रणबीर कपूर, मुंबई संघाचा सहमालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:10 am

Web Title: isl matches outside mumbai
टॅग : Isl
Next Stories
1 चला जाऊ माघारी!
2 जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचे विजयासह पदक निश्चित
3 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोवीच, सेरेना, मरे यांची आगेकूच
Just Now!
X