सातत्याच्या अभाव असलेल्या मुंबई सिटी एफसीचा इंडियन सुपर लीग स्पर्धेत घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान असणार आहे. चांगल्या खेळाडूंचा भरणा असूनही मुंबई सिटी एफसी संघाला सूर गवसलेला नाही आणि गुणतालिकेत त्यांची रवानगी शेवटून दुसऱ्या स्थानी झाली आहे.
डॉ.डी.वाय. पाटील स्टेडियमवर सख्खे शेजारी पुण्यावर ५-० असा दणदणीत विजय मिळवणाऱ्या मुंबईची गाडी या सामन्यानंतर घसरली. घरच्या मैदानावर विजयपथावर परतण्यासाठी मुंबईचा संघ आतुर आहे. मात्र त्यांना प्रमुख खेळाडू फ्रेडरिक ल्युजेनबर्गच्या अनुपस्थितीतच खेळावे लागणार आहे. ल्युजेनबर्गच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. सलामीच्या लढतीत दुखापतग्रस्त झालेला कर्णधार सय्यद रहीम नबी परतल्याने मुंबईच्या संघाला बळकटी मिळाली आहे. संघाच्या विजयात योगदान देण्यासाठी फ्रान्सचा निकोलस अनेलका उत्सुक आहे. पुण्यााविरुद्ध गोलची हॅट्ट्रिक नोंदवणारा आंद्रे मॉरित्झवर मुंबईची भिस्त आहे.
दुसरीकडे सचिन तेंडुलकर सहमालक असलेल्या केरळा ब्लास्टर्सने पुण्याविरुद्ध विजय मिळवला होता. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी ते इच्छुक आहेत. इयन ह्य़ूमचा फॉर्म ब्लास्टर्ससाठी महत्त्वपूर्ण आहे. डेव्हिड जेम्सच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या ब्लास्टर्स संघात भारतीय वंशाचा मायकेल चोप्रा अद्याप छाप पाडू शकलेला नाही.