करोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. या लॉकडाउनचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला. सुमारे ४ महिन्यांच्या कालावधीपेक्षा जास्त काळ भारतात एकाही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं नाही. आजही खेळाडूंना सरावाला परवानगी देण्यात आली असली तरीही कोणत्याही स्पर्धेचं आयोजन करण्यात येत नाहीये. भारतीय फुटबॉल क्षेत्रात महत्वाची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या ISL म्हणजेच इंडियन सुपर लिगने एक पाऊल पुढे टाकत यंदाच्या हंगामाचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा पार पडणार असून यंदा गोव्याला यजमानपदाचा मान देण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आरोग्यविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन होईल असंही आयोजकांनी स्पष्ट केलंय.

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, खेळाडू व संघातील इतर सदस्यांना प्रवास करायला लागू नये यासाठी एकाच राज्यात स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत होते. केरळ आणि गोवा या दोन राज्यांमध्ये आयोजनासाठी चूरस होती. चर्चेअंती आयोजकांनी गोव्याला यंदा यजमानपदाचा मान द्यायचं ठरवलं आहे. खेळाडूंच्या व इतर सदस्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता गोवा राज्यात उपलब्ध असणाऱ्या तिन्ही मैदानावर यंदाची स्पर्धा खेळवली जाईल असं आयोजकांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यात जवाहरलाल नेहरी स्टेडीयम मार्गोवा, टिळक नगर स्टेडीयम वास्को द गामा आणि GMC Athletic Stadium बांबोलिम अशी तीन फुटबॉलची मैदानं आहेत. गोव्याला फुटबॉलचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचं पालन करुन या तीन मैदानांवर यंदाचे सामने खेळवले जातील. भारतीय फुटबॉल महासंघाने यंदाच्या I League चे स्पर्धे करोनामुळे फक्त कोलकात्यात भरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ISL आयोजकांनीही एकाच राज्यात स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.