मिश्र दुहेरी गटात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व; सेखोन व श्रेया-अर्जुन यांना कांस्यपदक

मनू भाकेरने सातत्यपूर्ण खेळ करताना सिडनी येथे सुरू असलेल्या कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले. १६ वर्षीय मनू आणि १९ वर्षीय अनमोल या युवा नेमबाजांनी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र गटात वर्चस्व गाजवत सुवर्णपदक पटकावले.

भारताच्याच जेनेमत सेखोनने महिलांच्या स्कीट प्रकारात कांस्यपदक जिंकले. दहा मीटर एअर रायफल प्रकारात १७ वर्षीय श्रेया अग्रवाल आणि १९ वर्षीय अर्जुन बबुटा या जोडीलाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मनू आणि अनमोल यांनी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र गटाच्या अंतिम फेरीत सुरुवातीपासून वर्चस्वपूर्ण खेळ केला. त्यांनी पात्रता फेरीत नव्या विक्रमाची (७७० गुण) नोंद करताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्याकडून त्याच ताकदीचा खेळ अपेक्षित होता आणि त्यावर ते खरे उतरले. त्यांनी एकूण ४७८.९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. चीनच्या लियू जिन्याओ आणि ली झूई या जोडीला (४७३.३) ५.६ गुणांच्या फरकाने रौप्यपदकावर, तर चीनच्याच वँग झेहाओ आणि झिओ जिआरुईक्सून यांना (४१०.७) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याच गटात भारताची गौरव राणा व महिमा अग्रवाल (३७०.२) ही जोडी चौथ्या स्थानावर राहिली.

१० मीटर एअर रायफल मिश्र गटात श्रेया आणि अर्जुन या जोडीने ४३२.८ गुणांची कमाई करत कांस्यपदक निश्चित केले. भारताच्याच इलावेनील आणि तेजस कृष्णा प्रसाद (३८९.१) यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. झू यिंगजी व लीयू युकी (४९६.२) आणि झ्ॉंग चँगोंग व गाओ मिंग्वेई (४९५.६) या चीनी जोडीने अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. महिलांच्या स्कीट प्रकारात भारताच्या जेनेमत सेखोनने ३६ गुणांसह कांस्यपदक निश्चित केले. या गटात ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅसलीन जोन्सने ५१ गुणांसह सुवर्ण, तर चीनच्या युफेई चेने ४७ गुणांसह रौप्यपदक जिंकले. जोन्सने या स्पध्रेत ऑस्ट्रेलियाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.