जर्मनीत सुरु असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १६ वर्षीय मनु भाकेरने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात २४२.५ गुणांची कमाई करत विक्रमाची नोंद केली. याचसोबत अनिश भनवालाने २५ मी. रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक पटकावलं.

या वर्षातलं मनू भाकेरचं हे सातवं सुवर्णपदक ठरलं आहे. यातील ३ पदकांमध्ये मनूने विक्रमी कामगिरीसह मिळवली आहेत. मनूच्या या कामगिरीमुळे भारताने आतापर्यंत स्पर्धेत १७ पदकं मिळवली आहेत. मनूने चीनच्या कायमान लूची लढत मोडून काढली, कायमानला रौप्य तर चीनच्यात झ्यु ली ला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. मनूने याआधी आपली सहकारी महिमा अग्रवालसोबत सांघिक प्रकारात कांस्यपदकाचीही कमाई केली.