नवी दिल्लीत सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषकात भारतीय नेमबाज पुन्हा एकदा फॉर्मात परतले आहेत. १० मी. एअर पिस्तुल (मिश्र) प्रकारात भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत भारतीय जोडीने चीन आणि जपानच्या खेळाडूंची झुंज मोडीत काढली. विश्वचषकाला सुरुवात झाल्यांनंतर अपुर्वी चंदेला आणि सौरभ चौधरी यांनी पहिल्या दोन दिवसांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र त्यानंतर भारतीय नेमबाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. अखेरीस मिश्र प्रकारात आणखी एका पदकाची कमाई करत भारताच्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन केलं आहे. दोघांनीही अंतिम फेरीत ४८३.४ गुणांची कमाई केली. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता.