भारताच्या मानवजीतसिंग संधू याने अमेरिकेतील टुस्कान येथे सुरू असलेल्या शॉटगन जागतिक नेमबाजी स्पर्धेत ‘सुवर्णवेध’ घेतला. त्याने दोन वेळा ऑलिम्पिक विजेतेपद मिळविणाऱ्या मायकेल डायमंड याच्यावर मात करत हे यश संपादन  केले.
संधूने पुरुषांच्या ट्रॅप विभागात पात्रता फेरीत १२१ गुण, तर अंतिम फेरीत १३ गुणांची नोंद केली. संधूने यापूर्वी २०१० मध्ये जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. अटलांटा (१९९६) व सिडनी (२०००) या ऑलिम्पिक स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू डायमंड हा संभाव्य विजेता मानला जात होता. मात्र त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने पात्रता फेरीत ११९ गुण तर अंतिम फेरीत नऊ गुणांची नोंद केली. रशियाच्या अ‍ॅलेक्सी अ‍ॅपिलोव्ह याने कांस्यपदक पटकावले.

‘‘डायमंडसारख्या बलाढय़ खेळाडूवर मात केल्यामुळे मला विशेष आनंद झाला आहे. सुवर्णपदकाबरोबरच त्याच्यावरील विजय माझ्यासाठी संस्मरणीय आहे. डायमंडशी स्पर्धा करताना थोडेसे दडपण होते, मात्र मी फक्त माझ्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच मला हे यश मिळविता आले. हिवाळ्यात मी या स्पर्धेकरिता जोरदार सराव केला होता. भारतात झालेल्या अनेक स्पर्धामध्ये मी अव्वल यश मिळविले होते. त्या अनुभवाचा मला येथे फायदा झाला.’’
-मानवजीतसिंग संधू